मिलिंद सोमण, अरशद वारसी यांनी चीनी ‘टिकटॉक’ केले ‘बॉयकॉट’!

सोनम वांगचुक यांच्या ‘चीनी उत्पादनांवर बहिष्कार’ चळवळीला कलाकारांचा पाठींबा!

मुंबई : कोरोना विषाणू आणि भारत-चीन सीमेवर वाढत्या वादानंतर चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी होत आहे. आता अरशद वारसी यांनीही या मागणीला पाठिंबा दर्शविला आहे. अरशद वारसी यांनी सोशल मीडियावर याची घोषणा केली आहे.

अरशद वारसी यांनी ट्वीट करून लिहिले- ‘मी जाणीवपूर्वक असे म्हणत आहे की मी प्रत्येक चिनी वस्तू वापरणार नाही. आपण वापरत असलेल्या बर्‍याच गोष्टी चिनी आहेत. मला माहित आहे की या गोष्टीस थोडा वेळ लागेल पण, एक दिवस मी या चिनी वस्तूंपासून मुक्त होईन. तुम्हीही याचा प्रयत्न केला पाहिजे.’

अरशद वारसीच्या आधी मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण यांनीही त्यांच्या फोनवरून टिकटॉक काढून टाकले होते. मिलिंद सोमण यांनी सोनम वांगचुक यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत, ‘मी आता टिकटॉकवर नाही’, असे जाहीर केले.

सोनम वांगचुक यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये त्यांनी भारतीयांना आवाहन करत म्हंटले की ‘जर आपण चिनी वस्तूंची खरेदी थांबवली तरच चीन आर्थिकदृष्ट्या कमकुवत होईल. आपण दरवर्षी चीनकडून पाच लाख कोटी रुपयांचा माल खरेदी करतो. त्याचा वापर चीनने आपले लष्करी सामर्थ्य वाढविण्यासाठी केला आहे. आता आपण चीनवर दुहेरी हल्ला करायला हवा.’ त्यांच्या या आवाहनाला कलाकारांसह सर्वसामान्यांनचाही पाठींबा मिळत आहे.