‘मीच एकटी जाणती किंवा मीच फक्त मॅच्युअर व बाकी सारे इमॅच्युअर ” असे म्हणत शौमिका महाडिक यांची शरद पवार यांच्या विधानावर अप्रत्यक्ष टीका

कोल्हापूर : ‘मी चुकूच शकत नाही, मीच एकटी जाणती किंवा मीच फक्त मॅच्युअर व बाकी सारे इमॅच्युअर,’ असा माझा अजिबात दावा नाही, असे ट्विट कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी बुधवारी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षरित्या शरसंधान केल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात सुरू झाली.

नेमके काय झाले: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार याने २७ जुलै रोजी अभिनेता सुशांतसिंह आत्महत्येची सीबीआय चौकशी करण्याची मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना पवार यांनी अजून तो अपरिपक्व असल्याने त्याच्या मागणीला कवडीची किंमत देत नसल्याचे काल म्हटले होते.

हाच अपरिपक्वतेचा संदर्भ घेऊन शौमिका महाडिक यांनी लगेच साडे चार वाजता ट्विट केले. त्यामध्ये त्या म्हणतात, आज गोपाळकाला आहे, महाभारतामध्ये कौटुंबिक वादातून सातत्याने अन्याय सहन करावा लागलेल्या ‘पार्थ’चे युद्धात ज्याने सारथ्य केले त्या श्रीकृष्णाचा दिवस..!

त्यानंतर अर्ध्या तासातच शौमिका महाडिक यांनी आणखी एक ट्विट केले, “मगाशी एका ट्विट मध्ये मी चुकून श्रीकृष्णाचा पार्थ असा उल्लेख केला.माणसाकडून चुका होतात. जेमतेम 2-3 मिनिटात चूक कळताच मी ती सुधारली. पण तरीही मी चुकले हे मला बिलकुल मान्य आहे.मी चुकूच शकत नाही, मीच एकटी जाणती किंवा मीच फक्त मॅच्युअर व बाकी सारे इमॅच्युअर असा माझा अजिबात दावा नाही.”

पार्थ पवार यांच्यावर शरद पवार यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर लगेचच शौमिका महाडिक यांनी केलेल्या ट्विट मुळे त्यांनी अप्रत्यक्ष शरद पवार यांनाच टोला लगावल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात रंगली आहे.