संपूर्ण जगाला हादरवून सोडणाऱ्या कोरोनाचा भारतात प्रवेश झाला आहे. महाराष्ट्र सुद्धा कोरोनाच्या विळख्यात अडकून पडला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडूनकोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी वेळोवेळी खबरदारीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. कोरोनाच्या बाबतीत प्रशासन अधिक सतर्क झाले असून नागरिकांना स्वतःची व स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासन वारंवार करताना दिसून येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पंतप्रधानांद्वारे देशामध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती , मात्र आठ जून पासून राज्यात अनलॉक 1.0 ची सुरुवात करण्यात आली. मुख्यमंत्र्यांकडून काही अटी आणि शर्तींवर राज्यातील आर्थिक घडामोडी हळूहळू चालू करण्यात आल्या. उद्योगधंद्यांना आणि व्यवसायांना अटींवर परवानगी देण्यात आली आहे.
यातच आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनेही कोरोनासोबत जगायचे ठरवले आहे. आज नऊ जून पासून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे दादर येथील टिळक भवन हे कार्यालय पुन्हा सुरू करण्यात आले आहे. प्रशासनाच्या नियमानुसार या काँग्रेसच्या कार्यालयांमध्ये केवळ दहा टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती राहणार आहे तसेच या सर्व कर्मचाऱ्यांना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भेटायला येणाऱ्या नागरिकांना अपॉइंटमेंट घेऊनच प्रवेश देण्याच्या सूचना संबंधितांकडून देण्यात आले आहेत. याबाबतची माहिती राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंट द्वारे दिली आहे. याबाबतची अधिक माहिती देताना बाळासाहेब थोरात म्हणतात की, “गेल्या दोन महिन्यांचा काळ हा सर्वांसाठीच मोठ्या संकटाचा होता या काळात प्रशासनासह नागरिकांनीदेखील धैर्याने काम केले आहे. लॉकडाऊन असल्यामुळे पक्ष कार्यालय बंद ठेवण्यात आले होते मात्र पक्षाचे काम बंद नव्हते. ऑनलाईन पद्धतीने सुरूच राहिले होते. लोकांच्या या गंभीर काळात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि नेतेमंडळींनी रस्त्यावर उतरून गरीब ,गरजू, कामगार लोकांना मोठ्या प्रमाणात मदत केली. यावेळी या लोकांना अन्नधान्य ,रेशन औषधे ,सॅनिटायझर ,मास्क याचे मोठ्या प्रमाणात मदत केली. कोरोनाच्या पाठोपाठ राज्यावर निसर्गचक्री वादळाचे देखील संकट आले होते. यावेळी राज्य सरकारने पश्चिम किनारपट्टीवर एनडीआरएफची पथके तैनात केली होती. तसेच किनारपट्टीवरील लोकांना वेळी सुरक्षित ठिकाणी हलवले .
मात्र निसर्गाच्या या चक्रीवादळाच्या तडाख्यात कोकणात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे प्रशासनाकडून या या नुकसानीचे पाहणी करून तातडीने संबंधित यंत्रणांना आदेश देऊन सर्व पूर्ववत करण्याचे सांगितले आहे. घरांची झालेली पडझड शेतीमालाचे नुकसान याबाबत पंचनामे करण्याचे आदेशही तातडीने देण्यात आले असून हे काम पूर्ण करण्याचे संबंधित विभागांना टार्गेट देण्यात आले होते बहुतांश भागातील पंचनाम्याचे काम पूर्ण झाले असून श्रीवर्धन मुरुड रायगड तसेच इतर जास्त ठिकाणी नुकसान झालेल्या भागातील पंचनाम्याचे काम हे लवकरच पूर्ण होईल” असे थोरात यांनी यावेळी सांगितले.