Corona Alert: Lockdown maintained till July 31 by state government

Corona Alert : राज्यसरकारकडून ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम

राज्यातील कोरोना विषाणू प्रादुर्भावाशी सामना करण्यासाठी मिशन बिगिन अंतर्गत देण्यात आलेल्या सवलतींसह दि. 31 जुलै 2020 पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णयाची अधिसूचना शासनाने आज निर्गमित केली. या कालावधीत विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त त्यांच्या क्षेत्रात आवश्यक निर्बंध घालू शकतील. अत्यावश्यक नसलेल्या कामांसाठी तसेच नागरिकांच्या चलनवलनास प्रतिबंध घालू शकतील. व्यक्तिगत व्यायाम, दुकानांमधील खरेदी या बाबी संबंधित व्यक्तींच्या नजीकच्या परिसरात करता येतील. यासाठी सामाजिक अंतर,व्यक्तिगत स्वच्छता या बाबींचे पालन करणे आवश्यक राहील. कार्यालयीन कामकाजासाठी जाण्यायेण्यास प्रतिबंध राहणार नाही.

कोविड विषाणू नियंत्रणासाठी राष्ट्रीय स्तरावरील सूचना

  • मास्कचा वापर :  सार्वजनिक ठिकाणे, कार्यस्थळे या ठिकाणी तसेच प्रवासादरम्यान चेहरा झाकून घेणारी साधणे/ मास्क वापरणे बंधनकारक आहे.
  • सामाजिक अंतर पाळणे(सोशल डिस्टंसिंग) : प्रत्येक व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी वावरताना इतरांपासून किमान  6 फुटाचे (दो गज की दूरी) अंतर राखावे.
  • ग्राहक सुरक्षित अंतर राखतील याची दुकानदारांनी काळजी घ्यावी,दुकानांमध्ये एका वेळी 5 व्यक्तींपेक्षा अधिक ग्राहकांना प्रवेश देऊ नये.
  • जमावाबाबतची बंधने : मोठ्या प्रमाणावर जमाव होऊ शकणारे समारंभ/सभा आदींना यापुढेही प्रतिबंध राहील.विवाह सोहळ्याला 50 पेक्षा अधिक अधिक अभ्यागतांना आमंत्रित करता येणार नाही. अंत्यसंस्कार आणि त्यासंबंधित विधींना 50 पेक्षा अधिक व्यक्तींना सहभागाची परवानगी नसेल.
  • सार्वजनिक ठिकाणी थुंकणे शिक्षापात्र असून त्यासाठी संबंधित प्राधिकरणाचे कायदे, नियम, नियमनानुसार असलेला दंड लागू राहील.
  • मद्य, पान, तंबाखू इ. चे सार्वजनिक ठिकाणी सेवन करण्यास प्रतिबंध राहील.

कामाच्या ठिकाणी पाळावयाच्या मार्गदर्शक सूचना :

  • घरातून काम (वर्क फ्रॉम होम) :  शक्यतोवर  घरातूनच काम करण्याची पद्धत अवलंबली पाहिजे.
  • कार्यालये, कामाची जागा, दुकाने,  बाजारपेठ, औद्योगिक तसेच व्यावसायिक आस्थापनांमध्ये कामाचे/  व्यवसायाच्या वेळेचे विभाजन करण्याचा नियम पाळला पाहिजे.

 तपासणी व स्वच्छता

  • कार्यालयाच्या सर्व प्रवेशद्वारांवर तसेच  बाहेर पडण्याच्या दरवाज्याजवळ थर्मल स्कॅनिंग (शरीराचे तापमान मोजणे) , हात धुणे आणि सॅनिटायझर ची व्यवस्था करावी .
  • संपूर्ण कामाची जागा , सामान्य सुविधा आणि मानवी संपर्कात येणाऱ्या सर्व गोष्टींची/ वस्तूंची वारंवार स्वच्छता करण्यात यावी. शिफ्ट मध्ये काम करताना प्रत्येक शिफ्टनंतर दरवाज्याचे हॅन्डल इत्यादी गोष्टींची स्वच्छता राखणे आवश्यक आहे.
  • सुरक्षित अंतर : –  कामाच्या ठिकाणी असलेले सर्व कर्मचारी / कामगारांमध्ये प्रत्येक  शिफ्टच्या वेळांमध्ये पुरेसे अंतर ठेउन काम करतील याची दक्षता घेतली जाणे आवश्यक राहील. कर्मचाऱ्यांनी दुपारचे जेवण एकत्र घेऊ नये व  त्यांनी सुरक्षित अंतर पाळावे याबाबींची कार्यालय प्रमुखाने काळजी घेणे आवश्यक राहील.