aksar patel

इंग्लंडचे ‘अक्सर’ समोर लोटांगण; ११२ धावांमध्ये इंग्लंडचा डाव गुंडाळला

अहमदाबाद : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना आज (दि. २४ फेब्रुवारी) आहे. या कसोटीचे दोन खास वैशिष्ट्ये आहेत. हा डे-नाईट कसोटी सामना असून गुलाबी चेंडूने खलवण्यात येईल. दुसरं म्हणजे सामन्याचे आयोजन जगातील सर्वात मोठ्या स्टेडियम अर्थात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी (मोटेरा) स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. या स्टेडियममध्ये हा पहिलाच सामना खेळवला जात आहे.

इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या निर्णयाचा इंग्लंडला पश्चाताप होईल अशी स्थिती भारतीय गोलंदाजांनी केली आहे. सुरुवातीपासूनच एका मागोमाग एक धक्के बसलेल्या इंग्लंडकडून झॅक क्रॉली ( ८४ चेंडूत ५३ धावा ) वगळता कोणालाच चांगली कामगिरी करता आली नाही. झॅक क्रॉली याला दुसऱ्या बाजूने साथ मिळत नव्हती.

अशातच, अक्सर पटेलने त्याला देखील तंबूत धाडलं. यानंतर, इंग्लंडचे एक एक खेळाडू माघारी परतत होते. अक्सर पटेलने निम्म्याहून अधिक म्हणजेच ६ बळी घेत इंग्लंडच्या संघाला सुरुंग लावला. यामुळे इंग्लंडने पहिल्या डावात ११२ धावांमध्ये भारतीय गोलंदाजांसमोर लोटांगण घातले आहे. १०० वा कसोटी सामना खेळणाऱ्या इशांत शर्मा ने १, तर आर. अश्विन याने ३ बळी घेतले आहेत.