Congress

सम्राटनगरमध्ये कॉग्रेसच्या उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच

कोल्हापूर :

कोल्हापूर महापालिकेचा प्रभाग क्रमांक ६३ सम्राटनगर हा प्रभाग यावेळी सर्वसाधारण असा आरक्षित झाल्याने या प्रभागातून महापालिकेत जाण्यासाठी इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. सम्राटनगर हा सुशिक्षित-नोकरदार- मध्यमवर्गीय तसेच काही उच्चभ्रू लोकांची वस्ती असणारा प्रभाग राजकिय दृष्टया खूप महत्त्वाचा आहे कारण, कॉंग्रेसचे कोल्हापूर उत्तरचे विद्यमान आमदार चंद्रकांत जाधव यांचं प्राबल्य याठिकाणी दिसून येतं. गतवेळी त्यांच्या पत्नी जयश्री जाधव यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवून त्या विजयी झाल्या होत्या.
ऑक्टोबर २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीपासून मात्र या प्रभागातील राजकीय गणितं पूर्णपणे बदलली. भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवून या प्रभागाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या जयश्री जाधव यांचे पती उद्योजक चंद्रकांत जाधव यांनी काँग्रेसच्या हातात हात देऊन त्यांच्या तिकिटावर विधानसभेची निवडणूक लढवीत त्यात त्यांनी बाजी देखील मारली. त्यापासून याठिकाणची राजकीय स्थिती बदलून गेली आहे, भाजपचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या या प्रभागात आता काँग्रेसची ताकद वाढली आहे. या प्रभागातील लढत कॉंग्रेस , भाजप आणि शिवसेनेमध्ये होणार असून यावेळी शिवसेना आणि भाजप पूर्ण ताकदीनिशी रिंगणात उतरणार हे नक्की. प्रभाग सर्वसाधारण असा खुला झाल्याने काँग्रेसकडे उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी पाहायला मिळते. यातच पुन्हा एकदा आमदार जाधव आपल्या पत्नीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु असून आमदार आणि नगरसेवक पद एकाच घरात ठेवण्यापेक्षा एखाद्या कार्यकर्त्याला संधी द्यावी अशी भावना इच्छुकांमधून व्यक्त होत आहे.
सम्राटनगर प्रभागातून काँग्रेस मधून समीर कुलकर्णी, सर्जेराव साळोखे, इंद्रजित पाटील व कपिल मोहिते हे निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. कपिल मोहिते हे आमदार जाधव यांचे निकटवर्तीय मानले जातात, त्यांनीही आरक्षण जाहीर झाल्यानंतर लोकांच्या भेटीगाठी घेत आपण निवडणूक लढवण्यास उत्सुक असल्याचे जाहीर केले. सम्राटनगर हा प्रभाग कोल्हापूर दक्षिण या विधानसभेच्या मतदारसंघामध्ये येत असल्यामुळे पालकमंत्री सतेज पाटील आणि कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांचा शब्द देखील महत्वाचा ठरणार आहे. या प्रभागातून पालकमंत्री सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या जवळचे मानले जाणारे समीर कुलकर्णी यांनी देखील निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे, त्यांनी लोकांच्या भेटीगाठीवर भर दिला असून, सोशल मिडियाच्या माध्यमातून ते केलेली कामे मतदारांसमोर ठेवत आहेत.
माजी सभागृह नेते सुरेश ढोणुक्षे हे देखील या प्रभागातून निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत, त्यांनी देखील भेटीगाठीवर भर दिला आहे.
मा. नगरसेविका माधुरी साळोखे यांचे चिरंजीव बांधकाम व्यावसायिक सर्जेराव साळोखे आणि इंद्रजीत पाटील यांनी देखील मतदारांच्या भेटीगाठीच्या माध्यमातून आपल्या उमेदवारीचा दावा केला आहे.
पालकमंत्री सतेज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव व कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील हे काय निर्णय घेतात आणि शेवटच्या क्षणी काँग्रेस कडून कुणाला उमेदवारी मिळते हे पाहण औत्सुक्याचे ठरणार आहे.