Bahireshwar Grampanchayat

बहिरेश्वर ग्रामपंचायतने बनवले ग्रामपंचायत मोबाईल अ‍ॅप

एका क्लिकवर मिळणार करांसह विविध विषयांची माहिती, राज्यभरातील समित्यांचे बाजारभाव

कोल्हापूर : अनेक ग्रामस्थांना आपण कराचा भरणा केला किंवा नाही, तसेच किती कर आहे, याबाबत माहिती नसते. बहिरेश्वर गावातील ग्रामस्थांना मात्र एका क्लिकवर करासह विविध विषयांची माहिती मिळत आहे. ग्रामपंचायतने तयार केलेल्या मोबाईल अ‍ॅपवर सर्वच सुविधा देण्यात आली आहे.

डिजिटल व्यवहार करण्यासाठी शासन प्रोत्साहन देत आहे. बहिरेश्वर ग्रामपंचायतने एक मोबाईल अ‍ॅप तयार केले आहे. या अ‍ॅप मध्ये गावाविषयी, पदाधिकारी,प्रतिनिधी कृषी विज्ञान, बाजारभाव, ई- दवंडी, बातम्या, विकासकामे, मार्केट, आरोग्य, शिक्षण, नोकरीविषयक, महत्वाचे संपर्क, उद्योग, सेवा व योजना ग्रामपंचायत प्रशासन, विषय समित्या, आदीविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. गावची परिपूर्ण माहिती या अ‍ॅप वर असून ग्रामस्थ या माध्यमातून माहिती मिळवू शकतात. पदाधिकाऱ्यामध्ये गावाचे सरपंच,उप- सरपंच, व सदस्यांचे मोबाईल क्रमांक उपलब्ध आहे. कृषी विषयक वाहिनीवर शेतकऱ्या साठी झालेले मार्गदर्शक कार्यक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत. राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये शेतमालाचे भाव पाहण्याची सुविधाही या मोबाईल अ‍ॅप वर आहे. तसेच गावात दिली जाणारी दवंडीही अ‍ॅप वर उपलब्ध होणार आहे.

सुशिक्षित बेरोजगार लोकांसाठी नोकरीविषयक माहिती, गावातील शेतकऱ्यांसह व्यवसाय करणाऱ्यांना या अ‍ॅप च्या माध्यमातून विक्रीसाठी दालन उपलब्ध झाले आहे. शेतकरी आपल्याकडे असलेल्या शेतमालाची माहिती अ‍ॅप वर देऊ शकतात. तसेच ज्यांना खरेदी करायचे आहे त्यानाही हे अ‍ॅप उपयोगी पडेल असे ग्रामविकास अधिकारी आर.आर.भगत यांनी सांगितले.

या अ‍ॅप मधून गावातील आरोग्य कर्मचारी, शिक्षण विभागातील कर्मचारी यांची माहिती देण्यात आली आहे. हे अ‍ॅप तयार करण्यासाठी सरपंच सौ. साऊबाई नारायण बचाटे, उपसरपंच रंजना रामचंद्र दिंडे, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक आर.आर.भगत यांनी परिश्रम घेतले.