कर्जबुडव्या विजय मल्ल्या भारतात परतणार; आर्थर रोड तुरुंगात होणार रवानगी

नवी दिल्ली : भारतीय बँकाचं हजारो कोटींचं कर्ज बुडवून फरार झालेला कर्जबुडव्या विजय मल्ल्या कधीही भारतात परतू शकतो. त्याच्याविरोधात मुंबईमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असल्यामुळे त्याला लंडनहून थेट मुंबईत आणण्यात येणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री मल्ल्याचे विमान मुंबई विमानतळावर लँड होऊ शकते. रात्री मुंबईत पोहोचल्यानंतर काही काळ सीबीआय कार्यालयात ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी न्यायालयात हजर करण्यात येईल.

यू के येथील कोर्टाने 14 मे रोजी विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणावर शिक्कामोर्तब केलं होतं. नियमानुसार भारत सरकारने त्या तारखेपासून 28 दिवसांच्या आत त्याला यूकेहून भारतात आणलं पाहिजे. प्रत्यार्पणाची कायदेशीर प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली आहे. त्यामुळे मल्ल्याला आता कधीही भारतात आणलं जाणार आहे.

विजय मल्ल्याला मुंबईत आणल्यानंतर वैद्यकीय पथक त्याच्या प्रकृतीची तपासणी करणार आहे. सीबीआय आणि ईडीचे अधिकारी विजय मल्ल्यासोबत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तसेच विजय मल्ल्याला भारतात आणल्यानंतर थेट कोर्टात घेऊन जाण्यात येणार आहे. तसेच त्याची रवानगी आर्थर रोड तुरुंगात केली जाणार आहे.

विजय मल्ल्याला आर्थर रोड तुरुंगात ठेवणार

ब्रिटनमध्ये ऑगस्ट 2018मध्ये मल्ल्याच्या याचिकेवर सुनावणीदरम्यान, भारतीय यंत्रणांना विजय मल्ल्याला कुठे ठेवण्यात येणार, यासंदर्भात विचारणा केली होती. त्यावेळी मुंबईतील आर्थर रोड जेलचा व्हिडीओ कोर्टात सादर करण्यात आला होता.

नेमकं काय आहे प्रकरण?

बँक फसवणूक प्रकरणात 2017 साली पहिला खुलासा करण्यात आला. मद्य व्यावसायिक आणि किंगफिशर विमान कंपनीचा मालक असलेल्या विजय मल्ल्याने आयडीबीआय आणि अन्य काही बँकांचे मिळून 9500 कोटींचे कर्ज बुडवल्याचे उघड झाले. त्यानंतर पळून गेलेला विजय मल्ल्या सध्या इंग्लंडमध्ये राहात आहे. मल्ल्याला भारताकडे सोपवण्यात यावं, यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न चालू आहेत. इंग्लंडच्या न्यायालयातही मल्ल्याविरोधात केस चालू आहे.

भारतीय बँकांनी दाखल केला होता खटला

भारतीय बँकांनी ब्रिटनच्या कोर्टात दाखल केलेला 1.55 बिलियन डॉलर म्हणजे अंदाजे दहा हजार 432 कोटी रुपयांचा खटला मल्ल्या हरला होता. विजय मल्ल्याची संपत्ती जप्त करण्याचे आदेश मागे घेण्यास ब्रिटनच्या कोर्टाचे न्यायाधीश अँड्रयू हेनशॉ यांनी नकार दिला. 13 भारतीय बँकांनी मल्ल्याविरोधात फसवणूक आणि मनी लाँड्रिंगचा खटला दाखल केला होता. मल्ल्याची जगभरातील संपत्ती गोठवण्याचा आदेश कोर्टाने कायम ठेवला आहे. त्याचप्रमाणे मल्ल्याकडून 10 हजार कोटींची वसुली करण्यासही बँकांना परवानगी देण्यात आली होती.

विजय मल्ल्याचं भारत सरकारला ऑफर करणारं ट्वीट

मद्य सम्राट विजय मल्ल्याने भारत सरकारला दिलेली कर्ज परतफेडीची ऑफर स्वीकारुन आपल्याविरुद्ध सुरु असलेल्या केस बंद कराव्यात अशी मागणी केलीय. विजय मल्ल्याने भारत सरकारकडे यापूर्वी ट्वीटच्या माध्यमातून 100 टक्के थकित कर्ज भरण्यासाठी तयार असल्याचं कळवलं होतं. त्यानंतर काही दिवसांपूर्वी एक ट्वीट करत याच मागणीचा पुनरुच्चार ट्वीटरच्या माध्यमातून केला होता. या ट्वीटमध्ये त्याने भारत सरकारचं कोविड-19 आर्थिक पॅकेजसाठी अभिनंदन करतानाच, भारत सरकार त्यांना हव्या तेवढ्या चलनी नोटा छापू शकतं पण माझ्या सारख्या लहान घटकाकडे, जो त्याचं 100 टक्के थकित कर्ज परतफेड करायला तयार आहे, त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही. कोणत्याही अटी आणि शर्तीशिवाय माझ्याकडे थकित असलेल्या कर्जाची रक्कम स्वीकारा आणि माझ्याविरुद्ध सुरु असलेली सर्व प्रकरणे थांबवा. असं विजय मल्ल्या यांनी आपल्या ट्वीटमध्ये स्पष्ट केलंय.