Gokul Election

गोकुळ निवडणूक : शाहू आघाडीकडे तिकिटासाठी नेत्यांच्या घरातील व्यक्तीच इच्छुक, इतर इच्छुकांमध्ये अस्वस्थता

कोल्हापूर : गोकुळ निवडणुकीची प्रक्रिया जशी सुरू होईल, तशी निवडणुकीमधील रंगत वाढत आहे. गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चार दिवसांपूर्वी आकारास आलेल्या राजर्षी शाहू आघाडीकडे नेत्यांच्या मांदियाळीसह उमेदवारीसाठी गर्दी वाढल्याने इच्छुकांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे. गेली ५ वर्षे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात संघर्ष केलेले बरेच जण तिकीटापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

सत्तारूढ गटातील ५ संचालक आपल्याकडे वळवत राजर्षी शाहू आघाडीने निवडणूक एकतर्फी असल्याची हवा तयार केली. मात्र, सत्तारूढ गटाच्या नेत्यांनी सावध भूमिका घेत आघाडीतील हवा काढण्याची व्यूहरचना आखली, त्यानुसार आपण शाहू आघाडीसोबत आहे, असा पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना निरोप देऊन गेलेले दोन नेते अस्वस्थ आहेत.

दुसऱ्या नेत्याने जिल्हा बँकेचे राजकारण सोडवून घेण्यासाठी अट घातल्याचे समजते. त्यानुसार तेथील दुसऱ्या गटाची सगळी ताकद बँकेच्या निवडणुकीत लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. गेली पाच वर्षे विरोधी आघाडीसोबत असणाऱ्या एका माजी संचालकानेही सत्तारूढ गटाशी संपर्क साधला आहे.

महाविकास आघाडीकडून या निवडणुकीत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नाविद मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक यांचे चिरंजीव वीरेंद्र मंडलिक, माजी आमदार के.पी.पाटील यांचे सुपुत्र रणजित पाटील, माजी आमदार चंद्रदीप नरके यांचे बंधू अजित नरके, अनुसूचित जाती गटातून आमदार राजू आवळे, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर हे इच्छुक आहेत. महिला गटातून आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या पत्नी स्वरूपा पाटील-यड्रावकर यांचेही नाव पुढे येत आहे.  नेते मंडळींच्या घरातील लोकच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्यामुळे इतर इच्छुकांचा अपेक्षाभंग होणार आहे.