CSK Vs KKR

IPL CSK Vs KKR : जेतेपदाचे सोने कोण लुटणार?

दुबई : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या १४व्या हंगामाचे जेतेपदाचे सोने शुक्रवारी कोण लुटणार, ही उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे.

अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेल्या चेन्नई सुपर किंग्जला चौथ्या विजेतेपदापासून रोखण्याचे कडवे आव्हान फिरकी त्रिकुटासह खेळणाऱ्या ईऑन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाइट रायडर्सपुढे असणार आहे. आकडेवारीची तुलना केल्यास ‘आयपीएल’मध्ये नऊ वेळा अंतिम फेरी गाठणाऱ्या चेन्नईचे पारडे जड आहे. परंतु नऊपैकी फक्त तीनदा त्यांना जेतेपदात रूपांतर करता आले आहे. परंतु कोलकाताने अंतिम फेरी गाठल्यावर दोन्ही वेळा विजेतेपद निश्चितपणे जिंकले आहे.

कोलकाता नाइट रायडर्स : वेंकटेशला रोखण्याचे आव्हान

सातत्याने फलंदाजी करणारा शुभमन गिल (एकूण ४२७ धावा), दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध विजयी षटकार खेचणारा राहुल त्रिपाठी (३९५) आणि नितीश राणा (३८३) यांच्यावर कोलकाताच्या फलंदाजीची मदार आहे. परंतु अमिरातीच्या दुसऱ्या टप्प्यात कामगिरी उंचावणारा वेंकटेश अय्यरला (३२० धावा) रोखण्याचे आव्हान चेन्नईच्या गोलंदाजांपुढे असेल. याशिवाय मॉर्गन, दिनेश कार्तिक, शाकिब अल हसन, सुनील नरिन यांच्यासारखे भरवशाचे फलंदाज कोलकाताकडे आहेत.

फिरकी त्रिकुटाचे चक्रव्यूह

कोलकाताच्या गोलंदाजीचे यश वरुण चक्रवर्ती (एकूण १८ बळी), नरिन (१४ बळी) आणि शाकिब (४ बळी) या फिरकी त्रिकुटामुळे मिळवले आहे. याशिवाय लॉकी फग्र्युसन (१३ बळी), प्रसिध कृष्णा (१२ बळी), शिवम मावी यांच्यासारखे वेगवान गोलंदाज कोलकाताकडे आहेत.

खेळपट्टीचा अहवाल : दुबईची खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल

मानली जाते. परंतु सामना पुढे जातो, तशी ती धिमी होत जाते. त्यामुळे १७० ही धावसंख्या होण्याची शक्यता आहे. सध्याच्या ‘आयपीएल’मधील ११ पैकी ९ सामने हे लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने जिंकले आहेत.

चेन्नई सुपर किंग्ज ऋतुराजवर भिस्त

धोनीच्या मार्गदर्शनाखाली गेली दोन वर्षे विकसित झालेल्या पुण्याच्या ऋतुराज गायकवाडवर (एकूण ६०३ धावा) चेन्नईच्या फलंदाजीची प्रमुख भिस्त आहे. यंदाच्या हंगामात त्याने एक शतक आणि चार अर्धशतके झळकावली आहेत. ३७ वर्षीय फॅफ डय़ू प्लेसिसच्या (५४७ धावा) साथीने तो चेन्नईला सातत्याने उत्तम सलामी नोंदवून देत आहे. याशिवाय मोईन अली, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, धोनी हे अनुभवी फलंदाज गरजेनुसार संघाला उपयुक्त योगदान देत आहेत.

शार्दूलवर मदार

भारतीय संघात स्थान मिळवणारा वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूर (एकूण १८ बळी), ड्वेन ब्राव्हो (१३ बळी), दीपक चहर (१३ बळी), जोश हेझलवूड आणि लुंगी एन्गिडी यांच्यासारखे तेज गोलंदाज चेन्नईकडे आहेत. याशिवाय जडेजा, मोईन, इम्रान ताहीर यांच्यासारखे हुकमी फिरकी गोलंदाजही आहेत.