prakash abitkar on gokul

आ. आबिटकर सत्ताधारी पॅनेल मध्ये सहभागी होण्याची शक्यता

कार्यकर्त्यांचा दबाव वाढला

राधानगरी : ‘गोकुळ’ दूध संघाची निवडणूक जसजशी जवळ येतेय तसे राजकारणाची नवी समीकरणं जिल्ह्यासमोर येत आहेत. गोकुळसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया चालू झाली असून नेतेमंडळी भविष्यातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून व्यूहरचना करत आहेत.

आज सकाळीच विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीत गेलेले शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील-सरुडकर हे अखेर पुन्हा सत्तारूढ आघाडीत परतले. त्यांचे कट्टर विरोधक जनसुराज्यचे आमदार विनय कोरे हे महाविकास आघाडीत सामिल झाल्याने कार्यकर्त्यांची होणारी कोंडी लक्षात घेऊन त्यांनी अखेर आज (शुक्रवार) हा निर्णय घेतला. माजी आमदार महादेवराव महाडीक आणि आ. पी. एन. पाटील यांची सरूड येथे भेट घेऊन त्यांनी हा निर्णय घेतला.

सत्यजित पाटील यांच्यासारखीच अवस्था शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर यांची झाली असून त्यांच्यावर कार्यकर्त्यांचा दबाव वाढला आहे.

राधानगरी तालुक्यात आ. आबिटकर यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस हाच प्रमुख विरोधक आहे.

विरोधी आघाडीमध्ये आ. आबिटकर यांचे विधानसभेचे प्रमुख विरोधक के.पी.पाटील, ए.वाय.पाटील, अरुण डोंगळे हे राष्ट्रवादी कडून असल्यामुळे आ. आबिटकर त्यांच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. गोकुळची ताकद विरोधकांना मिळाल्यास विधानसभा आणि जिल्हा परिषद निवडणुकीत आपल्या अडचणी वाढतील असे आबिटकर गटाला वाटत आहे. करवीरचे आमदार पी.एन.पाटील यांची राधानगरी मतदारसंघात लक्षणीय मते आहेत, भोगावती साखर कारखान्याच्या माध्यमातून राधानगरी तालुक्यात आमदार पी.एन.पाटील मानणारा एक गट आहे . तसेच महादेवराव महाडिक यांचा देखील राधानगरी तालुक्यात स्वतःचा गट असून या दोन्ही नेत्यांच्या विरोधात जाणे आ. आबिटकर परवडण्यासारखे नाही.

या सगळ्या गोष्टींचा विचार करून कार्यकर्त्यांनी आमदार आबिटकर यांच्यावर दबाव टाकला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आ. आबिटकर काय निर्णय घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.