dilip walse patil

शरद पवारांचा ‘पी.ए’ ते थेट महाराष्ट्राचा गृहमंत्री… दिलीप वळसे पाटील यांचा थक्क करणारा प्रवास !

पुणे : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर आता महाराष्ट्राचा नवा गृहमंत्री कोण असा प्रश्न सध्या चर्चेत होता. गृहमंत्रीपद हसन मुश्रीफ यांच्याकडे सोपवले जाणार असल्याचा दावा भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आज दुपारी केला होता .तसेच गृहमंत्रीपदासाठी राष्ट्रवादीकडून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील, उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या नावाची चर्चा सुरु होती. मात्र आता शरद पवारांचे अत्यंत विश्वासू आणि हुकमी एक्का असणारे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील(dilip walse patil) यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकृत करावा असे विनंती पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना दिले आहे. त्यामुसार आता दिलीराव वळसे पाटील महाराष्ट्राचे नवे गृहमंत्री असणार आहेत.

दिलीप वळसे हे राष्ट्रवादीमधून आंबेगाव तालुक्यातून तब्बल सात वेळा आमदार म्हणून निवडून आले. त्यांचे वडील माजी आमदार दत्तात्रेय वळसे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राजकारणाची सुरुवात केली. याआधी त्यांनी शरद पवार यांचे PA म्हणून देखील काम केले आहे. १९९० च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवून वळसे-पाटील यांनी बाणखेले यांचे गुरू अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील यांना पराभूत केले.

वळसे पाटील यांनी एकेकाळी दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबेगाव विधानसभा मतदार संघाचा कायापालट केला. त्यासाठी वळसे पाटील यांनी हुतात्मा बाबू गेनू जलाशय अर्थात आजचे डिंभे धरण या निधीअभावी रेंगाळलेल्या कामाला प्राधान्य दिले. निधी उपलब्ध होण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्याकडे पाठपुरावा केला. दरम्यानच्या काळात धरणाचे काम पूर्ण होई पर्यंत घोड व मीना या दोन नद्यांवर ४० कोल्हापूर पद्धतीचे बंधारे होण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. उजव्या व डाव्या कालव्याच्या कामाला गती दिली. त्यामुळे आंबेगाव तालुका पाण्याबाबत स्वंयपूर्ण झाला. भीमाशंकर साखर कारखान्याची उभारणी केली. कारखान्याचाही कीर्ती देशभर होण्यासाठी वळसे पाटील यांचे प्रयत्न यशस्वी ठरले.

‘सचिन वाझेंमुळे अडचणी निर्माण होतील – संजय राऊत

आजपर्यंत सलग सात वेळा विजय मिळवून तीस वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. युतीचे सरकार असताना विधानसभेत चमकदार कामगिरी केल्याने त्यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार पण मिळाला आहे. दिलीप वळसे पाटील यांनी अवसरी खुर्द येथे शासकीय अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन हि दोन महाविद्यालये व घोडेगाव येथे आय टी आय प्रशिक्षण संस्था सुरु केली. आदिवासी भागात आश्रमशाळा इमारती, भीमाशंकर परिसर विकास, मंचर येथे उपजिल्हा रुग्णालय, क्रीडा संकुल, एसटी आगार, काठापूर, मंचर सह एकूण दहा वीज उपकेंद्र यासह रस्ते पूल, थापलिंग येथे पोलीस प्रशिक्षण केंद्र आदी विकासाची कामे मोठ्या प्रमाणात त्यांनी केली आहेत. त्यामुळे ते आतापर्यंत चढत्या मताधिक्याने विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले आहेत.

२००९ ते २०१४ या कालखंडात विधानसभेचे अध्यक्ष पद भूषवले आहे, त्यासोबतच राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी काम करत असताना साखर उद्योग व शेतकऱ्यांसाठी देशपातळीवर काम केले आहे. १४ ऑगस्ट २०१७ वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या उपाध्यक्ष पदावर त्यांची निवड झाली. दरम्यान, वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ऊर्जा, अर्थ आदी महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळली आहेत.

आता राष्ट्रवादी अडचणीत असताना शरद पवारांचा हा हुकमी एक्का पुन्हा एकदा आपल्या नेत्याच्या मदतीला धावून आला आहे. दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्री पद स्वीकारताच त्यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर उभा असणार आहे. सर्वात आधी गृहमंत्रालयाची मलीन झालेली प्रतिमा सुधारण्याचे मोठे आव्हान दिलीप वळसे पाटील यांच्यासमोर असणार आहे. त्यासोबतच पोलिसांवर लागलेला ‘वसुली’चा डाग साफ करण्यासाठी वळसे पाटील यांनी मोठ काम करावं लागणार आहे. त्यासोबतच तिन्ही पक्षांतील बिघडत चाललेले सबंध सुधारावण्याची जबाबदारी देखील वळसे पाटील यांनाच पेलावी लागणार आहे.