चंद्रकांतदादांना कोल्हापूर युवक कॉंग्रेसकडून मिळाले आगळेवेगळे आव्हान

चंद्रकांतदादांना कोल्हापूर युवक कॉंग्रेसकडून मिळाले आगळेवेगळे आव्हान

शिवसेना नेते संजय राऊत यांनी सामना या वृत्तपत्रासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखती दरम्यान त्यांनी भाजपवर बरेच आरोप आणि टीका देखील केली.
शिवसेना सोबत नसती तर भाजपच्या ४०-५० जागाही आल्या नसत्या असं शरद पवार यांनी या मुलाखतीमध्ये सांगितले होते. शरद पवार यांच्या या वक्तव्यावर चंद्रकांतदादा यांनी प्रत्युत्तरादाखल दोन्ही काँग्रेस व शिवसेनेनं वेगवेगळं लढून दाखवावं आणि आमदार निवडून आणून दाखवावे असे आव्हान दिले.

चंद्रकांतदादांना प्रत्युत्तर देण्यासाठी आता शरद पवार यांच्या समर्थनात युवक काँग्रेस मैदानात उतरली आहे. करवीर युवक कॉग्रेसचे सरचिटणीस राकेश काळे यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर एक व्हिडिओ अपलोड केला असून , या व्हिडिओ द्वारे चंद्रकांतदादाना त्यांनी  प्रति आव्हान दिले आहे. त्यांनी या व्हिडिओ मध्ये म्हटल्याप्रमाणे, कोल्हापूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातून निवडणूक न लढवता पुण्यातील कोथरुड हा भाजपसाठी सुरक्षित असणारा मतदारसंघ दादांनी निवडला आणि दादा आमदार झाले. त्याच धर्तीवर त्याच अनुषंगाने कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणारा कोणताही सुरक्षित जिल्हा परिषद मतदारसंघ त्यांनीच निवडावा आणि त्यांनी निवडणूक लढवून आपली डिपॉझिट राखून दाखवावी. भुईसपाट काय असतं आणि कोल्हापूरची स्वाभिमानी जनता कशा पध्दतीनं त्यांना त्यांची जागा दाखवते हे त्याठिकाणी त्यांना कळेल.

ऑक्टोबर २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला कोल्हापूरात एकही जागा जिंकता आली नसल्याच्या उद्वेगातून अख्ख जग सुधारेल पण कोल्हापूर सुधारणार नाही असं संतापजनक विधान चंद्रकांत पाटलांनी केलं होतं. त्यामुळे कोल्हापूरकर म्हणून आमच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. कोल्हापुरात राहून कोल्हापूरकरां बद्दल असं ते म्हणत असतील तर सबंध कोल्हापूरकर त्यांना त्यांची जागा दाखवतील, असेही राकेश काळे म्हणाले