lockdown in kolhapur

दुकानं सुरु – बंद हा खेळ थांबवा अन्यथा आम्ही महापालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीवर बहिष्कार घालू, कोल्हापुरातील व्यापाऱ्यांचा इशारा

कोल्हापूर – पुणे-मुंबई सारख्या मोठ्या शहरातील कोरोना आटोक्यात आला पण कोल्हापुरातील कोरोना रोखण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे, त्याची झळ समाजातील सर्वच घटकांना बसत असून, जोपर्यंत सर्व दुकाने सुरू करण्याचा शासन आदेश येत नाही तोपर्यंत व्यापाऱ्यांचा विश्वास बसणार नाही, त्यामुळे कोल्हापुरातील प्रशासनाने तात्काळ पावले उचलून दुकाने चालू करावीत. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्व निकष पाळण्याची व्यापाऱ्यांची तयारी असूनही, ठरावीक दुकानदारांना व्यापारापासून वंचित ठेवले जात आहे, असे व्यापारी संघटनेचे म्हणणे आहे..

प्रशासनाकडे आणि लोकप्रतिनिधींकडे सनदशीर मार्गाने मागणी करूनही न्याय मिळत नसल्याची व्यापाऱ्यांची भावना आहे. गेल्या आठवड्यात व्यापाऱ्यांच्या दबावापुढे झुकून प्रशासनाने ५ दिवस दुकाने उघडण्याची परवानगी दिली होती पण पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आणखी एक आठवडा व्यापाऱ्यांनी संयम पाळावा, अशी हात जोडून विनंती केली. ५ दिवस दुकाने चालू करून परत दुकाने बंद करायला लागत असल्यामुळे अगोदरच अडचणीत असलेला व्यापारी वर्ग त्रस्त झाला आहे.

यावेळी बोलताना व्यापारी म्हणाले कि, गेले जवळजवळ ९० दिवस आमची दुकाने बंद आहेत. त्यामुळे बरेच प्रश्न आमचा समोर आवासून उभे आहेत. व्यापार बंद असल्यामुळे दुकानाचे भाडे, कर्जाचा हफ्ता, इतर खर्च यामधून व्यापारी वर्ग मेटाकुटीला आला आहे. एप्रिलपासून राज्यात सर्वत्र लॉकडाऊन लागू केल्याने सर्व व्यवसाय आम्ही शासनाच्या विनंतीनुसार बंद केले आणि घरी बसलो पण एकीकडे व्यापाऱ्यांवर निर्बंध असताना राजकीय मंडळी निवडणुका, प्रचारसभा, मेळावे घेत सर्वत्र फिरत होती. याचाच परिपाक म्हणून कोल्हापूरचा पॉझिटीव्हीटी रेट कमी होत नाही.

काही दिवस दुकानं सुरु – बंद हा खेळ प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींनी थांबवावा अन्यथा आम्ही महापालिकामध्ये महाविकास आघाडीवर बहिष्कार घालू असा इशाराही यावेळी कोल्हापुरातील व्यापाऱ्यांनी प्रशासनाला दिला.