mahadik-kore-awade

भाजपची कोल्हापूर विधानपरिषद निवडणुकीची जबाबदारी महाडिक, कोरे आणि आवाडे यांच्या खांद्यावर

कोल्हापूर: महाराष्ट्रातील ८ विधानपरिषद जागांची मुदत संपली असून, यापैकी ६ जागांवर निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली आहे. कोल्हापुरसह राज्यातील विधान परिषदेच्या पाच जागांसाठी १० डिसेंबर रोजी मतदान होणार असून १४ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. कोल्हापुरमध्ये विद्यमान पालकमंत्री सतेज पाटील हे सध्या या जागेवर आमदार आहेत. या निवडणुकीसाठी १६ नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात होईल. या निवडणूकीच्या निमित्ताने कोल्हापुरातील राजकीय वातावरण तापले आहे.

पालकमंत्री पाटील यांच्या विरोधात भाजपकडून कोण उमेदवार असणार हे जरी गुलदस्त्यात असले तरी भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे. भाजपने २०१४ नंतर स्थानिक स्वराज्य संस्था गटात आपली पकड मजबूत केली आहे. जिल्हा परिषदेमध्ये तसेच अनेक नगरपरिषदांमध्ये भाजपने आपले उमेदवार निवडून आणले आहेत.
कोल्हापूर विधानपरिषद निवडणूकीमध्ये कॉग्रेस आणि भाजप यांच्या मध्ये जोरदार लढत होणार हे नक्की आहे. सध्या कोल्हापूरमध्ये भाजपचा एकही आमदार नाही आहे, त्यामुळे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी फिल्डींग लावल्याची चर्चा आहे.

राज्यात होणाऱ्या आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या विधानपरिषद निवडणुकीला फार महत्व प्राप्त झाले आहे.  भाजप कोल्हापूर विधानपरिषद निवडणुकीची सर्व जबाबदारी महाडिक,आमदार विनय कोरे,आमदार प्रकाश आवाडे यांच्या खांद्यावर देणार असल्याचे समजते. कोरे आणि आवाडे जरी भाजपमध्ये नसले तरी राज्यात ते भाजपचे सहयोगी सदस्य म्हणून काम करतात. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कोरे आणि आवाडे यांच्याशी चांगले संबंध असून भविष्यात भाजपची सत्ता आल्यास या दोघांनाही मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. कोरे आणि आवाडे यांच्याकडे असणाऱ्या मतदारांची संख्या लक्षात घेता या निवडणुकीत कोरे, आवाडे यांचा पाठिंबा भाजपसाठी महत्वाचा ठरणार आहे. महाडिक यांच्यासोबत आवाडे आणि कोरे यांनी फिल्डींग लावल्यास भाजप पालकमंत्री पाटील यांच्यासमोर जोरदार आव्हान उभे करून उमेदवार निवडून आणू शकतो असा विश्वास पक्षातील वरिष्ठ नेत्यांना आहे.

विधान परिषद निवडणूकीच्या निमित्ताने कोल्हापुरातील राजकीय वातावरण तापले

Follow us – 

ADVERTISEMENT –

Gadre Tea Company
Gadre Tea Company