भाजपकडून महाविकास आघाडीचा ‘करेक्ट कार्यक्रम’

मुंबई- नागपूर आणि अकोला-वाशिम-बुलढाणा विधान परिषदच्या निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला. या निवडणुकीत भाजपने आपली मते राखत महाविकास आघाडीची 96 फोडली असल्याचे चित्र निकालानंतर स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हा महाविकास आघाडीला मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. या अगोदर विधानपरिषदेच्या ६ पैकी ४ जागा बिनविरोध झाल्या होत्या त्यामध्ये मुंबईच्या २ , धुळे, कोल्हापूर येथील जागांचा समावेश होता.

१०  डिसेंबर रोजी मतदान झालेल्या २ जागांचा निकाल आज जाहीर झाला. नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपकडे आवश्यक संख्याबळ होते. मात्र, काँग्रेसने चमत्कार घडवण्याचा जो दावा केला होता तो मात्र फोल ठरला. काँग्रेस-महाविकास आघाडीची 16 मते भाजपने फोडली. भाजप उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांना 362 मते मिळाली तर, काँग्रेसचे उमेदवार मंगेश देशमुख यांना 186 मते मिळाली. भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले रविंद्र भोयर यांना एक मत मिळाले. मतदानाच्या काही वेळापूर्वी आधीच काँग्रेसने रविंद्र भोयर यांचा पाठिंबा मिळवत देशमुख यांना मतदान करण्याचे आवाहन केले होते मात्र काँग्रेसमध्ये उमेदवार निवडी वरून गोंधळ असल्याचे दिसत होते. मतदानाच्या काही तासांआधीच उमेदवार बदलला गेला. त्यामुळे काँग्रेसमध्ये एकमत नसल्याचे दिसून आले.

Gadre Tea Company
Gadre Tea Company

शिवाय अकोला अकोला-वाशिम-बुलडाणा विधान परिषद मतदारसंघातील बाजोरिया पॅटर्नला भाजपने मोडीत काढले. या मतदारसंघातून भाजपने अकोल्यातील सुप्रसिद्ध उद्योगपती आणि नितीन गडकरींचे कट्टर समर्थक वसंत खंडेलवाल यांना उमेदवारी दिली होती. अकोला महापालिकेसह अनेक नगरपरिषदांमध्ये भाजपची सत्ता आहे. शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया यांना भाजपने त्यांच्याच पॅटर्नने मात केली असल्याचे बोलले जात आहे. भाजपने महाविकास आघाडीची तब्बल 80 मते फोडली असल्याचे बोलले जात आहे.
भाजपच्या वसंत खंडेलवाल यांनी बाजोरिया यांचा तब्बल 109 मतांनी पराभव केला. तब्बल तीन वेळा आमदार असलेले शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरियांचा पराभव करत भाजपचे खंडेलवाल विजयश्री झाले. खंडेलवाल यांना 443 मते मिळाली. तर, बाजोरिया यांना 334 मते मिळाली. यात 31 मते अवैध झालीत.

बाजोरियांची निवडणूक लढविण्याची पद्धत वेगळी असते असे म्हटले जाते. ते विधानपरिषद निवडणूकीचे ‘जाणकार रणनितीकार’ म्हणून प्रसिद्ध आहेत. यातून त्यांनी स्वत: तीन निवडणुका जिंकल्या आहेत. तर मुलगा विप्लवला परभणी-हिंगोली मतदारसंघातून निवडून आणण्याची किमया त्यांचीच आहे. बाजोरिया शेवटपर्यंत विरोधकांसमोर आपले पत्ते उघडत नाहीत. यातून गाफील राहिलेल्या विरोधकांना पराभूत करण्याचं मोठं कौशल्य त्यांच्याकडे आहे. विरोधकांची मतं मोठ्या प्रमाणात फोडत ‘क्रॉस वोटींग’ घडवून आणण्याची किमया त्यांनी मागच्या तिन्ही निवडणूकांत करून दाखवली असली तरी, यंदा मात्र भाजपने त्यांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ केला असल्याचे चित्र स्पष्ट आहे.

विधान परिषदेचा लागलेला निकाल :
नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघ
चंद्रशेखर बावनकुळे (भाजप) : 362
मंगेश देसाई (काँग्रेस) : 186
रविंद्र भोयर : 01
अवैध : 5

अकोला वाशिम बुलढाणा स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघ
वसंत खंडेलवाल (भाजप) : 443
गोपीकिशन बाजोरिया (शिवसेना) : 334
अवैध मते : 31

फौंड्री कामगार ते आमदार चंद्रकांत जाधव यांचा थक्क करणारा प्रवास

Follow us – 

ADVERTISEMENT –

Healing Hands Physiotherapy & Rehabilitation
Healing Hands Physiotherapy & Rehabilitation