Minister Hasan Mushrif

कोल्हापूरच्या पालकमंत्री पदावरून काँग्रेस-राष्ट्रवादीत चढाओढ

निवडणुकांच्या रणधुमाळीच्या तोंडावर हसन मुश्रीफ यांचा हबकी डाव

कोल्हापूर – कोल्हापूरचे पालकमंत्रिपद मिळावे, अशी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दोन वर्षांनंतर पुन्हा जाहीर इच्छा व्यक्‍त केली. वाढता काँग्रेसचा प्रभाव रोखून राष्ट्रवादीला पुनवैभव मिळवून देण्यासह मंत्री हसनमुश्रीफ यांच्या मागणीला अनेक राजकीय कंगोरे आहेत. ज्येष्ठत्वाच्या आधारे जिल्ह्यात एकहाती नेतृत्व होण्याची संधी पालकमंत्रिपदामुळे मिळेल, अशी अटकळ बांधत मंत्री हसन मुश्रीफ यांनी निवडणुकांच्या रणधुमाळीच्या तोंडावर पुन्हा हबकी डाव टाकला आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूरच्या ‘पालकमंत्रिपदाची मागणी पक्षश्रेष्टींकडे केली होती. तिन्ही पक्षांतील राजकीय समझोत्यानुसार कोल्हापूरचे ‘पालकमंत्रिपद’ काँग्रेसच्या वाट्याला गेले. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदी निवडही जाहीर झाली. मात्र, थोरात यांनी नकार दिल्याने पालकमंत्रिपदाची माळ गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या गळ्यात पडली. दरम्यान, मंत्री हसन मुश्रीफ यांनी अहमदनगर जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली. ग्रामविकास आणि कामगार या दोन खात्यांची जबाबदारी सांभाळत नगर जिल्ह्याला अधिक वेळ देता येत नसल्याचे मुश्रीफ यांचे म्हणणे आहे. आघाडी सरकारच्या द्विवर्ष समाप्तीच्या पूर्वसंध्येला मुश्रीफ यांनी पुन्हा कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदाची इच्छा व्यक्‍त करत चर्चेला तोंड फोडले. जिल्ह्यात येत्या वर्षभरात विधानपरिषद,जिल्हा बँक, महापालिका, बाजार समिती, पाच साखर कारखान्यांसह लहान-मोठ्या सुमारे हजारभर संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा उडणार आहे. पालकमंत्री म्हणून रोज या ना त्या कारणाने कोल्हापूरकरांसमोर जाता येते. राज्यस्तरावरून वर्षभरात एखाद्या मोठ्या ठळक कामापेक्षा जिल्ह्यात ‘पालकमंत्रिपदावरून’ आपल्या मतदारांसमोर राहता येईल, अशी अटकळ आहे.

माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या आरोपानंतर बॅकफूटवर गेलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मुश्रीफ यांना पालकमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळत कोल्हापुरात अधिक वेळ थांबून उभारी देता येईल,असा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत मतप्रवाह आहे. पालकमंत्रिपदाच्या आडाने भाजपसह मित्रपक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यावर वचक ठेवत स्वपक्षाची मोट अधिक घट्ट करण्याची व्यूहरचना राष्ट्रवादीची असू शकते, अशा अनेक राजकीय कंगोर्‍यांमुळेच
हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूरच्या पालकत्वाची मागणी केल्याची चर्चा आहे.

निवडणुकीचा काळ असल्याने कोल्हापूरचे पालकमंत्रिपद हवे – ना. हसन मुश्रीफ

Follow us – 

ADVERTISEMENT –

Gadre Tea Company
Gadre Tea Company