Chandrakant Jadhav Anna

फौंड्री कामगार ते आमदार चंद्रकांत जाधव यांचा थक्क करणारा प्रवास

कोल्हापूर- अल्पावधीतच लोकप्रियता गाठलेले कोल्हापूर उत्तरचे लाडके आणि घरच्या माणसासारखे असणारे आमदार चंद्रकांत जाधव (आण्णा) (Chandrakant Jadhav Anna) यांचे आज दुर्दैवी निधन झाले. फौंड्रीमध्ये काम करण्यापासून ते यशस्वी उद्योजक शिवाय एक उत्कृष्ट खेळाडू ते विधानसभेचे पहिल्यावेळीच आमदार होण्याचे भाग्य लाभलेले असे आमदार चंद्रकांत जाधव हे व्यक्तिमत्त्व. प्रेमाने सर्वजण त्यांना “आण्णा” म्हणूनच हाक मारत असत अगदी आमदार झाले तरीही. त्यांनीही कधी आपण आमदार असल्याचा रुबाब केला नाही. आण्णांच्या दारात आलेला कोणताही माणूस कधीच रिकाम्या हाताने माघारी गेला नाही, मग ते तरुण मंडळ असो, सामाजिक संघटना असो की फुटबॉल संघ. कोणताही स्वार्थ आणि प्रसिद्धी न ठेवता सर्वांना मदत करणारा व्यक्ती असा आमदार चंद्रकांत जाधव यांचा नावलौकिक होता.
चंद्रकांत जाधव 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत फक्त १५ दिवसांत त्यांनी विजयी मिळवला. पण हा विजय मिळवण्या अगोदर आण्णांनी केलेला संघर्ष वाखाणण्याजोगा आहे. फौंड्री कामगार ते यशस्वी उद्योजक आणि फुटबॉलपटू ते आमदार असा आमदार जाधव यांचा प्रवास त्यावेळी कोल्हापुरात चर्चेचा विषय ठरला होता.

शतकी परंपरा लाभलेला कोल्हापूरचा फुटबॉल आणि इथले जगावेगळे फुटबॉलप्रेमी प्रसिध्द आहे. राजकारणातही फुटबॉलपटूंचा मोठा वावर राहिलेला आहे. अनेक फुटबॉलपटूंनी महापालिकेच्या महापौर व नगरसेवकपदांची धुरा सांभाळली आहे. फुटबॉलपटूंच्या या परंपरेत थेट विधानसभेत मजल मारली ती चंद्रकांत जाधव यांनी. आयटीयआयच्या राज्य फुटबॉल स्पर्धेतही आमदार जाधव खेळले. राज्याच्या फुटबॉल स्पर्धेतला हुकमी एक्काही ठरले.

या अगोदर कोणतीही निवडणूक न लढवता ते थेट विधानसभेचे आमदार बनले. महापालिकेच्या निवडणुकीत ते थेट उतरले नाहीत. १९८५ मध्ये त्यांनी शिवसेनेकडे उमेदवारी मागितली. पण त्यांना ऐनवेळी बाजूला केले गेले. भाऊ संभाजी जाधव यांना त्यांनी तीन वेळा वेगवेगळ्या मतदारसंघातून निवडून आणले.
विधानसभा निवडणुकी अगोदर भाजपमध्ये असलेल्या जाधव यांना काँग्रेसने आग्रह करून उमेदवारी दिली आणि १५ दिवसांच्या कमी कालावधीतच थेट विजयालाच गवसणी घातली.
पुढे २०२० मध्ये कोरोना आल्यामुळे आमदार म्हणून तसा त्यांना कमी कलावधीच मिळाला. पण कोरोनाच्या काळात जवळजवळ १५००० कुटुंबाना त्यांनी अन्नधान्याची मदत केली. तसेच वैद्यकीय क्षेत्रात मंत्री हसन मुश्रीफ यांच्यानंतर सर्वात जास्त काम केल्याची नोंद मुख्यमंत्री कार्यालयात आहे.

कोल्हापुरात हल्लीच एक घटना घडली होती, ज्यातून ते लोकप्रतिनिधी असणं कसं समर्पक ठरत होते ते दिसलं.
तर कोल्हापूर शहरात एन्ट्री करताना जी स्वागत कमान लागते त्या कमानीवरचे होर्डिंग भाड्याने दिले होते. त्यावर ‘संजय घोडावत युनिव्हर्सिटी’ असा बोर्ड होता. कोणीतरी सोशल मीडियावर पोस्ट टाकली आणि ती व्हायरल झाली, त्याला विरोध होऊ लागला.
पुढच्या दिवशी माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी शिवसैनिकांना सोबत घेऊन तो बोर्ड हटवला आणि दुसरा लावला. यावर आमदार जाधव यांनी सामंजस्याची भूमिका घेऊन संबंधित होर्डिंग ठेकेदाराला ऑफिसमध्ये बोलवून घेतलं आणि त्या स्वागत कमानवरील होर्डिंग एक वर्षासाठी बुक केलं. त्यावर लिहले गेलं ‘राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन’ ‘सहर्ष स्वागत.

Gadre Tea Company
Gadre Tea Company

 

कधी शिवाजी युनिव्हर्सिटी मध्ये फिरायला गेला तर तिथे हा माणूस तुम्हाला दिसेल. लोकं आश्चर्य करतात कोल्हापुरातील लोकांना चंद्रकांत जाधव हे जॉगिंगच्या ड्रेसकोड मध्ये जास्तीत जास्त पहायला मिळालेत. सकाळी फिरुन आलं कि लोक भेटतात तोपर्यंत कुठल्यातरी भागाच्या समस्या असतात कोणीतरी कॉल करतं हा माणुस त्याच कपड्यांवर त्या भागात भेट द्यायला जात होता. कोणीही कोणत्याही कार्यक्रमाचं निमंत्रण देवो कितीही वेळ झाला तरी हा माणूस हजर. सकाळी लवकर ड्रायव्हर वगैरे आलेला नसेल त्यावेळी आमदार जाधव आपली टु व्हिलर घेऊन लोकांच्या सेवेत हजर असत असा हा इतका साधा सरळ माणूस.
कोणाचेही नुकसान करायचे नाही, स्टंटबाजी तर अजिबात नाही, समन्वयाने व सामंजस्याने प्रश्न सोडवायचा ही त्यांची भूमिका असायची. स्वतः एक नामवंत उद्योजक असल्यामुळे प्रत्येक काम दर्जेदार कसे होईल, त्यामध्ये पैसे कसे वाचतील याबाबत प्रशासनाला ते कायम सूचित करायचे.
त्यामुळंच संपूर्ण कोल्हापूरच्या मुखात एकच वाक्य आहे आज..
“लई भारी माणूस हुता, राव !”

Follow us – 

ADVERTISEMENT –

Healing Hands Physiotherapy & Rehabilitation
Healing Hands Physiotherapy & Rehabilitation