लॉकडाऊनमध्ये मोबाईलचे व्यसन सुटले की जडले ?

लॉकडाऊनमध्ये मोबाईलचे व्यसन सुटले की जडले ?

“कराग्रे वसते लक्ष्मी,करमध्ये सरस्वती ,करमुले तू गोविंदा प्रभाते करदर्शनम्” आपल्या संस्कृतीमध्ये पहाटे श्लोक म्हणून रोजच्या दिवसाची सुरुवात होत असे, पण हल्लीच्या काळात गडबड अशी झाली की, युवा पिढीने हा श्लोकच बदलून टाकला तो असा की, “कराग्रे फिरती स्क्रीनवर, करमध्ये मोबाईल,कर मुले तू चॅटिंग प्रभाते स्टेटस चेंजिंग” अशाप्रकारे आजची तरुणाई दिवसाची सुरुवात करते आणि खरंच ही परिस्थिती ज्याच्या त्याच्या घरात आहे. अगदी तुमच्या आणि माझ्याही, आपण रोज सकाळी आपल्या घरातल्यांना शुभप्रभात म्हणण्याऐवजी आलेल्या मेसेज मधला एखादा चांगला मेसेज बघून तोच सगळ्यांना फॉरवर्ड करतो. अशाप्रकारे आजची युवा पिढी सकाळची सुरुवात करते.

सगळ्यांना वाटलं होतं की या लॉकडाऊनच्या काळात तरी सगळे एकत्र येतील कुटुंबात वेळ घालवतील आणि त्यांचे मोबाईल चे व्यसन सुटेल पण झाले असे की सगळे एकत्र आले, आपापल्या कुटुंबासह वेळ घालवला, काही जणांनी एकत्र येऊन पदार्थ बनवले तर काही जणांनी एकत्रित खेळ खेळल, लॉकडाउन च्या निमित्ताने सगळे स्वयंपाक घरात गेले आणि नवनवीन पदार्थ केले ,काहींचे चुकले तर काहींना जमले, पण मोबाईल मात्र काही सुटला नाही… कारण हे कौतुक फक्त चार दिवसांपुरतेच होते. कुटुंबासह वेळ घालवून सेल्फी काढून स्टेटस ला #quarantine fun म्हणून टाकले, जरा चुकलेले जरा जमलेले असे पदार्थ घरात असलेल्यांना दाखवण्याआधी #Made by me असे स्टेटस ठेऊन जगाला दाखवले कारण आलेल्या क्षण जगण्यापेक्षा तो जगाला दाखवण्याची  जास्त गरज लोकांना वाटू लागलीये.

घरात लहानमुलांपासून आजी-आजोबांजवळ देखील मोबाइल पाहायला मिळतो. हा मोबाईल तुम्हाला वापरता येतो का? असा प्रश्न विचारणारा कदाचित मूर्ख ठरेल. काय किमया आहे ना विज्ञानाची !..  या विज्ञानाने अशक्य गोष्टी शक्य करून दाखवल्या, मानवाला दीर्घायु केले इतकंच काय तर स्मार्टफोन सारखा अविष्कार ही घडविला. तळहातात मावणारा आणि फक्त एका स्पर्शामध्ये अनेक पर्याय खुले करणारा नाही तर संपुर्ण जगाच्या संपर्कात आणणारा हा स्मार्टफोन. या स्मार्टफोनमुळे जग नक्कीच जवळ आले परंतु माणसामाणसांतील दुरावा वाढत गेला. त्याचबरोबर विज्ञानाच्या सहाय्याने तयार झालेला विषाणू “कोरोना” यालाही मानवापासून मोबाईलला दूर करणे जमले नाही.

‘आपण करीत असलेल्या अतिवापरामुळे कुठेतरी हाच मोबाईल बदनाम होत आहे’, असं म्हणायला काहीच हरकत नाही, कारण परीक्षेत मुलाला कमी मार्क मिळाले की पालक असे म्हणत नाहीत की “मुलाने अभ्यास केला नाही”, तर “हा मोबाईल आहे ना त्याच्यामुळे झालंय !” अस मात्र नक्की म्हंटल जातं.. पण आज या लॉकडाऊन मध्ये याच मोबाईलवर मुलांना अभ्यास पाठविला जातो, त्यांचे ऑनलाइन वर्ग घेतले जातात. मोबाईल वाईट नक्कीच नाही पण या मोबाईल मध्ये सेल्फी काढता काढता आजची पिढी कधी सेल्फिश बनली हे कळलेच नाही. आज जगभरात ओढावलेल्या या कोरोना विषाणूच्या संकटामध्ये माणसाने माणुसकीच्या नात्याने मदत करण्याऐवजी प्रसिद्धीखातर मदत करणारे हात दिसतात आणि त्यामुळे मदत घेणार्‍यांचे हात ही कुठेतरी आकसले जातात हीच आजची खंत आहे. कालपर्यंत कष्टाने कमवून खाणाऱ्यांना आज अन्नाची मदत करत असताना फोटो काढून पोस्ट केले जातात कारण आजच्या पिढीला समोर असणाऱ्या गरजूंच्या भुकेपेक्षा स्वतःच्या पोस्टला येणाऱ्या लाईक्स ची भूक जास्त आहे.

तर मग वाईट कोण? मोबाईल? कोरोना? की स्वार्थी माणूस?