nana-patole-sanjay-raut

महाआघाडीत बिघाडी? संजय राऊतांच्या विरोधात नाना पटोलेंची मुख्यमंत्र्यांकडे धाव

“संजय राऊत यांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.”

मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्याकडून काँग्रेसच्या नेतृत्वावर निशाणा साधत सातत्याने युपीएचं नेतृत्व बदलाची इच्छा व्यक्त करत आहेत. शरद पवार यांनी युपीएचं नेतृत्व  करावे, असं ते सातत्याने म्हणत आहेत. त्यावरून काँग्रेसच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या वक्तव्यांची तक्रार काँग्रेस नेत्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे .

सध्या युपीएचं नेतृत्व काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे आहे. त्यांची प्रकृती सध्या ठीक नसते. देशात अनेक घडामोडी घडत असताना युपीए कमजोर झाली आहे. त्यामुळं काँग्रेसबाहेरीन नेत्याने युपीएचे नेतृत्व करण्याची मागणी प्रादेशिक पक्षांकडून होत आहे. सोनिया गांधी यांचीही भूमिका तशी असावी, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पत्रकार परिषदेत संजय राऊत यांच्यावर टीका केली.

राऊत यांच्यावरून काँग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेस व संजय राऊत यांच्यामध्ये जुंपली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊत यांची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले, संजय राऊत हे शिवसेनेचे खासदार आहेत. शिवसेना ही युपीएत सहभागी नाही. ते राष्ट्रवादीचे खासदार बनलेले नाहीत. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांकडे याबाबत विचारणा केली आहे. संजय राऊत यांची अशी विधाने चुकीची असल्याचे त्यांना सांगितले असून त्यांना जाब विचारावा, अशी मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी बोलण्याचे आश्वासन दिल्याचे पटोले यांनी सांगितले.

पटोले यांनी विरोधकांवरही टीकास्त्र सोडले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून होत असलेले आरोप खोटे आहेत. हे आरोप लावणाऱ्या लोकांचे राज्यपाल ऐकतात. त्यांचे आरोप चुकीचे असल्याचे आम्ही राज्यपालांना सांगणार होतो. पण त्यांची वेळ मिळाली नाही. आता ते आम्हाला वेळ देतील तेव्हा ही सगळी माहिती दिली जाईल, असेही पटोले यांनी सांगितले.