कोल्हापूर : प्रतिनिधी
उच्चभ्रू वस्ती असलेला प्रभाग क्र ३७ तवन्नाप्पा पाटणे हायस्कूल हा यावेळी सर्वसाधारण झाल्याने या प्रभागात जोरदार लढत बघायला मिळणार आहे. या प्रभागातील सर्व इच्छुक उमेदवार तगडे असल्याने इथे तुल्यबळ लढत होणार हे नक्की.
गतवेळच्या निवडणुकीत या प्रभागात नागरिकांचा मागासवर्ग महिला आरक्षण पडल्यामुळे १९९५ पासून या प्रभागाचे नेतृत्व करणाऱ्या जाधव कुटुंबियांना शेजारील प्रभाग क्र ३९ मधून निवडणूक लढवावी लागली. त्या प्रभागातून देखील मुरलीधर जाधव यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत विजय मिळवला. प्रभाग क्र. ३९ मध्ये सुद्धा यावेळी सर्वसाधारण महिला आरक्षण पडल्यामुळे दीपिका दिपक जाधव या उमेदवार असणार हे निश्चित आहे.
जाधव यांचे दोन्ही प्रभागात वर्चस्व असून त्यांचे पारडे सध्यातरी जड आहे . महापालिकेच्या महत्वाच्या या दोन्ही प्रभागातून विजय सोपा व्हावा यासाठी राष्ट्रवादी आणि भाजप हे दोन्ही पक्ष जाधव यांच्या उमेदवारीसाठी जोरदार फिल्डिंग लावत आहे. दोन प्रभागातून निवडणूक लढवणाऱ्या जाधव कुटुंबीयांनी आपल्या पक्षाची उमेदवारी घ्यावी यासाठी राष्ट्रवादी आणि भाजपकडून जोरदार प्रयत्न चालू आहेत. सध्या मुरलीधर जाधव हे राष्ट्रवादीचे नगरसेवक असून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. त्याचबरोबर जनसुराज्य पक्षाचे नेते आमदार विनय कोरे यांना देखील जाधव कुटुंब मानते, त्यामुळे आमदार विनय कोरे यांच्या माध्यमातून भाजप देखील जाधव यांच्या उमेदवारीसाठी आग्रही आहे. जेष्ठ नगरसेवक प्रा. जयंत पाटील यांची भूमिकाही याठिकाणी महत्वाची राहणार आहे. महाडिक कुटुंबियांशी देखील जाधव यांचे संबंध चांगले असल्याने आणि मा. खासदार धनंजय महाडिक यांच्यावर भाजपने महापालिकेची जबाबदारी दिल्याने ते देखील जाधव यांच्या भाजप उमेदवारीसाठी आग्रही आहेत.
अॅड. वंदुरे पाटील हे जाधव कुटुंबियांचे मार्गदर्शक असून आता या सगळ्या पार्श्वभूमीवर जाधव कुटुंब कोणता निर्णय घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.