pawar-on-anil-deshmukh

महाविकास आघाडीत खांदेपालटाच्या हालचालींना वेग, राष्ट्रवादी निर्णय घेण्याच्या तयारीत

महाविकास आघाडी सरकारमध्ये एप्रिल महिन्यात खांदेपालट होण्याची शक्यता आहे.

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रामुळे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने त्यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपने लावून धरली आहे. अखेर आता राष्ट्रवादीने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीने अनिल देशमुखांच्या खात्यात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल देशमुख यांच्यावर अनेक आरोप झाल्यामुळे राष्ट्रवादी अडचणीत आली आहे. विरोधकांनी अनिल देशमुख यांची मागणी लावून धरली आहे. मात्र, काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी परमबीर सिंग यांच्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही, त्यामुळे राजीनामा घेणार नाही, असं स्पष्ट केले होते.  पण, विरोधकांच्या वाढत्या दबावामुळे अखेर आता राष्ट्रवादीने गृहमंत्री अनिल देशमुख  यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राज्यात लवकरच मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होणार असून एप्रिल महिन्यात खांदेपालट होणार आहे. त्यामध्ये अनिल देशमुख यांच्या गृहखात्यात बदल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात नवी दिल्ली इथं जवळपास 2 तास एक महत्त्वपूर्ण बैठक झाली.  या बैठकीत पवार यांनी मुंबईतील घडामोडींबाबत गृहमंत्र्यांकडून सविस्तर माहिती घेतली. तसंच पोलीस यंत्रणेकडून झालेल्या कारभाराबाबत शरद पवार यांनी गृहमंत्र्यांना जाब विचारल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

त्यामुळे आता राष्ट्रवादीकडून गृहमंत्रिपदासाठी नव्या चेहऱ्याचा शोध घेतला जात आहे आणि यासाठी आता शरद पवार पुन्हा आपल्या धक्कातंत्राचा वापर करणार असल्याचीही माहिती समोर येत आहे.