nirav modi

पीएनबी बँकेला १४ हजार कोटींचा चुना लावून परदेशात गेलेला ठग नीरव मोदी अखेर भारतात परतणार !

लंडन : पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणातील आरोपी हिरे व्यापारी नीरव मोदी याला २०१९ मध्येच परागंदा आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित करण्यात आले होते. पंजाब नॅशनल बँकेची (पीएनबी) १४ हजार कोटींची फसवणूक केल्याचा आरोप असलेला व प्रकरण उघड होताच भारतातून पळून गेलेल्या नीरव मोदीला या बँकेनेच बेकायदा मदत केली केली होती, असे फॉरेन्सिक ऑडिटमधून उघड झाले होते.

अब्जाधीश हिरे व्यापारी नीरव मोदी आणि त्याचे कुटुंबीय बँकेला गंडा घालून २०१७ साली डिसेंबर महिन्यात देशाबाहेर फरार झाले होते. यानंतर, दोन वर्षांपूर्वी नीरव मोदी यांना ब्रिटनच्या स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी लंडनमधून १३ मार्च २०१९ रोजी अटक केली होती, त्यानंतर दक्षिण-पश्चिम लंडनच्या वॅन्ड्सवर्थ कारागृहातील तुरुंगात डांबण्यात आले होते.

त्याला भारताकडे सोपवले जावे यासाठी विशेष प्रयत्न केले जात होते. अखेर आज या प्रयत्नांना यश आलं आहे. नीरव मोदीच्या भारतात प्रत्यार्पणासाठी लंडनच्या वेस्टमिन्स्टर दंडाधिकारी न्यायालयाने गुरुवारी मान्यता दिली. नीरव मोदीविरोधात भारतात एक खटला चालू आहे, ज्याचे उत्तर त्याला द्यावे लागेल, असंही लंडनच्या वेस्टमिन्स्टर न्यायदंडाधिकाऱ्यांनी सांगितलं. नीरव मोदी याच्यावर पुरावे नष्ट करण्यासाठी आणि साक्षीदारांना धमकावण्याचा कट रचणे, असे गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत.

प्रत्यार्पणाच्या आदेशाला नीरवने कोर्टात आव्हान दिले होते. अखेर दोन वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर भारताला यश आलं आहे. नीरव मोदीची मानसिक स्थिती व प्रकृती प्रत्यार्पणासाठी योग्य नसल्याचा दावाही लंडन कोर्टाने फेटाळून लावला. आर्थर रोडच्या बॅरेक 12 मध्ये नीरव मोदीला ठेवण्यात येणार असल्याच्या आश्वासनांनाही न्यायालयाने समाधानकारक म्हटले आहे. कोर्टाने म्हटले आहे की, मुंबईतील आर्थर रोड कारागृहातील बॅरेक 12 मध्ये ठेवावे. त्याला अन्न, शुद्ध पाणी, स्वच्छ शौचालय, पलंगाची सुविधा देण्यात यावी. मुंबई सेंट्रल जेलचे डॉक्टरही नीरवसाठी उपलब्ध असावेत.