uddhav_thackeray

देवेंद्र फडणवीसांना जशाच तसे उत्तर द्या; मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई- गेले काही दिवस राज्य सरकार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करत असलेल्या जोरदार आरोपांचे बुधवारी मंत्रिमंडळ आणि त्यानंतर वर्षावर झालेल्या बैठकीत जोरदार पडसाद उमटले. शिवसेनेसह राष्ट्रवादी तसेच काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांनी यावर संताप व्यक्त केला.

महाविकास आघाडीची प्रतिमा ठरवून मलिन करण्याचा प्रयत्न सुरु असून फडणवीस यांना आता जशास तसे उत्तर द्यायला हवे, अशी एकमुखी मागणी करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत आपल्या सहकार्‍यांना जशाच तसे उत्तर देण्यासाठी पुढे जाण्याच्या सूचना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अँटिलिया-सचिन वाझे प्रकरण, परमबीर सिंग यांचे आरोप, रश्मी शुक्लांच्या अहवालाच्या आधारे देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची कोंडी केली असताना आता त्यांना एकत्रितपणे जोरदार प्रत्युत्तर देण्याचा निर्धार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला.

मंत्री, अधिकाऱ्यांचे फोन टॅप केले जात होते. ही बाब अतिशय गंभीर असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी या बाबत चौकशीचे संकेत दिले.अनेक मंत्र्यांचे फोन टॅप करून सरकारला बदनाम करण्याचा कट होता. याची चौकशी करण्याची मागणी बहुतेक मंत्र्यांनी केली.

या बैठकीमध्ये परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची न्यायालयीन चौकशी करण्याचा महाविकास आघाडी सरकारने निर्णय घेतल्याचे कळत आहे. निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी होणार आहे.याचवेळी आपण अधिकाऱ्यांना ओळखण्यात कमी पडलो अशी खंत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्याचे समजते.