Pooja Chavan Pune

शिवसेनेकडून मंत्री संजय राठोडांना माध्यमांशी न बोलण्याचे आदेश

पुणे: परळी येथील रहिवासी असलेल्या पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यात आपले जीवन संपवले. तिच्या मृत्यूनंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. महंमदवाडीतील ए वन पार्क या उच्चभ्रू सोसायटीत राहत होती. पूजा चव्हाण ही रविवारी सोसायटीत आपल्या घरात होती. यावेळी सोबत तिचे दोन मित्रही होते. मध्यरात्रीच्या सुमारास तिने अचानक तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली. यामध्ये ती गंभीर जखमी झाली होती. तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. परंतु, तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दरम्यान, या तरुणीने असे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्यापही स्पष्ट झालं नसलं तरी महाविकास आघाडी सरकारमधील एका मंत्र्यांचं नाव या प्रकरणात जोडलं जात आहे. विदर्भातील एका मंत्र्यासोबत प्रेमसंबंध असून त्यातूनच तीने आपले जीवन संपवल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यामुळे विरोधी पक्षातील भाजपने या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली आहे.

पूजा चव्हाण प्रकरण : धक्कादायक ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्याने उडाली खळबळ

दरम्यान, आता या प्रकरणाशी संबंधित एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने या आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. या ऑडिओमध्ये एक व्यक्ती ‘ती आत्महत्या करणार आहे’ असे सांगत आहे. त्यामुळे तुम्ही समजावून सांगा, असे देखील ती म्हणत आहे. त्यामुळे संभाषण करणाऱ्या दोन व्यक्ती कोण आहेत असा देखील यानिमित्ताने प्रश्न निर्माण होत आहे.

भाजपच्या आक्रमक नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विटरवर म्हटलं की, पूजा चव्हाण घटनेत समोर आलेले सगळे अपडेट्स पहाता याचा थेट रोख शिवसेना मंत्री संजय राठोडांकडे जातो. पोलिसांनी स्यु-मोटोतंर्गत तक्रार दाखल करत मंत्री संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. मुख्यमंत्रीजी एवढे पुरावे असतानाही मुसक्या आवळायच्या सोडून कसली वाट पहाताय असा सवालही त्यांनी विचारला आहे.

या आरोपांनंतर अद्याप मंत्री संजय राठोड यांनी कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. तर त्यांचा कोणतही संपर्क सध्या होऊ शकत नाहीय. तर राठोड आहेत तरी कुठे असा प्रश्न माध्यमांतून विचारला जात आहे. दरम्यान त्यांची गाडी मंत्रालय परिसरात आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र राठोड हे मात्र अद्याप कुठे आहेत याची माहिती कोणीही दिलेली आहे. तर या प्रकरणावर शिवसेनेकडून माध्यमांशी न बोलण्याचा सल्ला राठोड यांना देण्यात आल्याच सांगण्यात येत आहे.