राज्यपाल नियुक्त आमदारकीच्या मोहापायी राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांची फसवणूक करू नये – राजवर्धन नाईक निंबाळकर

भाजप, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम, रिपाई आठवले गट या मित्रपक्षामार्फत राज्यव्यापी दुध आंदोलन
दुधाचा सरसकट दर ३० रुपये तसेच गायीच्या दुधाला १० रुपये आणि दुध भुकटीला ५० रुपये अनुदान मिळावे या मागणीसाठी भाजप, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम, रिपाई आठवले गट या मित्रपक्षामार्फत राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या शिरोळ तालुक्यात कसा प्रतिसाद मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. काल भाजप आणि मित्रपक्षांच्या वतीने उदगाव येथील गोकुळ दुध संघाच्या सेंटरसमोर गोमातेची पूजा करून आंदोलनाला सुरवात झाली. या आंदोलनाला शिरोळ वासियांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.

यावेळी बोलताना जि.प.सदस्य व भाजपचे शिरोळ तालुकाध्यक्ष  राजवर्धन नाईक निंबाळकर म्हणाले, कोरोनामुळे बरेच व्यवसाय अडचणीत आले आहेत, दूध उत्पादक तसेच पशुपालन करणाऱ्या शेतकरी वर्गास देखील प्रचंड नुकसान सहन करावे लागत आहे. दुधाचा दर कमी झाल्याने जनावरांना लागणारा चारा व त्यांच्यासाठी होणारा इतर खर्च हा मिळकतीपेक्षा जास्त होतो. या समस्यांवर ठाम उपाययोजना व्हावी यासाठी हे राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले आहे. फडणवीस सरकारने गायीच्या दुध भूकटीला दिलेले अनुदान बंद करण्याचे काम या सरकारने केले आहे.
गाईच्या दुधाला प्रति लिटर १०/- रुपये अनुदान, भुकटी पावडर साठी ५०/-रुपये प्रति किलो अनुदान द्यावे तसेच शासनाने रु ३०/- प्रति लिटर या दराने दुधाची खरेदी करावे या मागण्या आपल्या खंबीर पाठिंब्यामुळे नक्की पूर्ण होतील असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी भाजप आणि मित्रपक्षांच्या या आंदोलनावर टीका केली होती. भाजपचे हे आंदोलन म्हणजे पब्लिसिटी स्टंट आहे असे राजू शेट्टी यांनी म्हणले होते. या टीकेचा देखील राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी खरपूस समाचार घेतला. यावेळी निंबाळकर म्हणाले, मुळात हे आंदोलन कुणाच्या आंदोलनाला छेद देण्यासाठी नसून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे झालेले आंदोलनच एक पब्लिसिटी स्टंट होते. कारण स्वाभिमानी शेतकरी संघटनेला राज्य सरकारकडून १६ जुलै रोजी बैठकीचे निमंत्रण मिळालेले असताना १७ जुलै रोजी संघटनेकडून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि दुधाची नासाडी करून आंदोलन केले गेले. राजू शेट्टी हे स्वतः राज्य सरकारमध्ये असून, त्यांचे आंदोलन म्हणजे शेतकरी आणि कष्टकऱ्यांची फसवणूक आहे. राज्यपाल नियुक्त आमदारकीच्या मोहापायी राजू शेट्टी शेतकर्यांना फसवत असल्याचे देखील त्यांनी म्हटले.