Sachin Waze

‘सचिन वाझेंमुळे अडचणी निर्माण होतील – संजय राऊत

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटक प्रकरणात सुरु असलेल्या चौकशीत प्रत्येक दिवशी नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) यांना एनआयएने अटक केली आहे. तर, एटीएसने देखील सचिन वाझेंना या प्रकरणात संशयित आरोपी म्हणून घोषित केलं आहे.

या सर्व प्रकरणामुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढलेली पाहायला मिळत आहे. सचिन वाझे यांच्यावर सर्वप्रथम विधान परिषेदेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केला होता. परंतु यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘सचिन वाझे म्हणजे काही ओसामा बिन लादेन आहे का ?’ असे वक्तव्य केले होते.

यामुळे हे सरकार वाझेला पाठीशी घालत आहे असा आरोप विरोधकांकडून केला जात होता. परंतु आता एनआयए व एटीएसने केलेल्या तपासात सचिन वाझेंना या प्रकरणात संशयित आरोपी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

त्यामुळे आता विरोधी पक्षाने सरकारवर चांगलाच हल्लाबोल चढवलेला आहे. यामुळेच आता शिवसेनेचे नेते व राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे.

संजय राऊत म्हणाले की, ‘जेव्हा सचिन वाझेंना परत पोलीस सेवेत घेतलं होतं, तेव्हाच काही वरीष्ठ नेत्यांशी बोलताना मी म्हणालो होतो की, त्यांच्यामुळे पुढे अडचणी निर्माण होतील. काही वरिष्ठ आणि प्रमुख नेत्यांशी बोलताना म्हणालो होतो की, या अधिकाऱ्याचा स्वभाव आणि काम करण्याची पद्धत पाहाता आपल्यापुढे अडचणी निर्माण करू शकतील.

हे बोललो, ते नेतेही सांगतील. कोणताही अधिकारी वाईट नसतो, त्याला परिस्थिती वाईट बनवत असते. ज्या पद्धतीने हे प्रकरण घडलं, त्यावर कदाचित कुणाचं नियंत्रण राहिलं नसेल. यातून अनेक मंत्र्यांनाही धडा मिळाला असेल,’ असे संजय राऊत यांनी सांगितले.

सचिन वाझे प्रकरणावरून मुंबई पोलीस आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख अडचणीत आल्याचे पाहायला मिळत आहे. या संदर्भात संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. संजय राऊत यांनी केलेल्या विधानावरून आता पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण येणार असल्याचे सांगितले जात आहे.