Sanjay-Raut-Devendra-Fadanvis

ठाकरे सरकारकडून राज्यपालांचा अपमान?; संजय राऊतांनी दिलं उत्तर; म्हणाले…

मुंबई :

राज्यपालांना ठाकरे सरकारने विमान प्रवास नाकारल्याने भाजपा नेते आक्रमक झाले असून राज्य सरकारवर आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहे. राज्य सरकारने देहरादूनसाठी निघालेल्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना सरकारी विमानाने प्रवास नाकारल्याने त्यांना खासगी विमानाने प्रवास करावा लागला. जाणीवपूर्वक राज्यपाल विमानात बसेपर्यंत परवानगी देण्यात आली नाही असा गंभीर आरोप विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. दरम्यान या सर्व आरोपांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे.

“यामध्ये भाजपाचा काय संबंध आहे. भाजपाला जर इतकं वाईट वाटत होतं तर त्यांचं विमान द्यायला हवं होतं. भाजपाकडे खूप व्यवसायिक विमानं आहेत. कोश्यारी भाजपाचे नेते आहेत. अलीकडे राजभवनात राज्यापेक्षा भाजपाची कामंच जास्त चालतात अशी लोकांची भावना आहे. राज्यपालांचा अपमान व्हावा अशाप्रकारचं कोणतंही काम राज्य सरकार किंवा राज्याचे मुख्यमंत्री करणार नाहीत आणि त्यानी केलंही नाही,” असं संजय राऊत म्हणाले आहेत. दिल्लीत चर्चा व्हावी इतकं प्रकरण गंभीर आहे का याबाबत आपली उद्धव ठाकरेंशी चर्चा झाल्याची माहितीदेखील त्यांनी यावेळी दिली.

“राज्यापालांना खासगी कामासाठी सरकारी यंत्रणा वापरायची असेल तर त्यासंदर्भात काही नियम आहेत. त्या नियमांचं सरकाने उल्लंघन केलं असतं तर आक्षेप आला असता. अनेक राज्यांमध्ये असे प्रकार घडले आहेत. तुम्ही जेव्हा वैयक्तिक कामासाठी आपल्या राज्यात जाता तेव्हा विमान वापरण्यासंदर्भात गृहखात्याचे काही निर्देश आहेत. त्या निर्देशांचं पालन राज्य सरकारने केलं आहे,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

“महाराष्ट्र सरकारने संविधानाचा, कायद्याचा सन्मान राखला. जेव्हा जेव्हा राज्यपालांना सरकारी कामासाठी कोणतंही हेलिकॉप्टर, विमान हवं असेल तेव्हा ते सरकारने उपलब्ध करुन दिलं आहे. कोश्यारी गोव्याचेही राज्यपाल आहेत. तिथे भाजपाचं सरकार आहे, थोडा भार त्यांच्यावरही टाकायला हवा. यामागे कोणतंही राजकारण, सुडाची भावना नाही. सरकारने नियम आणि कायद्याचं पालन केलं आहे. त्यामुळे भाजपाचा तीळपापड होण्याची गरज नाही. जर उद्धव ठाकरेंच्या जागी मित्रपक्षातील इतर कोणी मुख्यमंत्री असतं तर त्यांनीसुद्धा याच नियमाचं पालन केलं असतं,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.

आतापर्यंतचं सर्वात अहंकारी सरकार असल्याच्या फडणवीसांच्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले की, “अरे बापरे…कोण कोणास म्हणाले ? असा प्रश्न असायचा. येथे अहंकाराचा प्रश्न कुठे येतो. नियम पाळणं अहंकार आहे का? ज्याप्रकारे कृषी कायद्यासंदर्भात केंद्र सरकार वागत आहे तो अहंकार नाही आणि नियमांचं पालन आहे तर मग राज्यपालांना नियमानुसार विमान मिळालं नाही हा अहंकार कसा असू शकतो?”.