shoumika mahadik

दुधात घाण पडू देऊ नका, नाहीतर दूध नासायला वेळ लागत नाही – शौमिका महाडिक

कोल्हापूर : गोकुळ निवडणुकीची प्रक्रिया जशी सुरू होईल, तशी निवडणुकीमधील रंगत वाढत आहे. ‘गोकुळ’ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकारणाची नवी समीकरणं जिल्ह्यासमोर येत आहेत. सत्तारूढ गटातील ५ संचालक आपल्याकडे वळवत राजर्षी शाहू आघाडीने निवडणूक एकतर्फी असल्याची हवा तयार केली असून सत्तारूढ आघाडीने सावध भूमिका घेत निवडणुकीची तयारी चालू केली आहे .

गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जि.प.सदस्य शौमिका महाडिक(shoumika mahadik) यांची एक फेसबुक पोस्ट चर्चेत आली आहे. शौमिका महाडिक यांनी या पोस्ट मध्ये आपली सविस्तर भूमिका मांडली. काळ कितीही पुढे सरकला आणि काहीही बदल झाले तरी गेली 25-30 वर्ष एक समीकरण मात्र कायम आहे. ते म्हणजे महाडिक साहेब, पी.एन.पाटील साहेब आणि नरके साहेब ! ही त्रिमूर्ती आज या वयातसुद्धा खंबीरपणे एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून उभी आहे. यापैकी प्रत्येकाने साथ निभावण्यासाठी म्हणून काही न काही पणाला लावलेलं आहे. तत्वाशी एकनिष्ठ राहून मैत्री कशी करायची असते अन ती कशी टिकवायची असते याचं यापेक्षा उत्तम उदाहरण अजून काय असू शकतं?, असेही त्या म्हणाल्या.

पुढे त्या म्हणतात, ” सभासदांचा विश्वास या 3 नेत्यांवर होता म्हणून इतकी वर्षे सत्ता राहिली. त्या विश्वासाला बांधील राहून तिघांनीही आपल्या आयुष्याची उमेदीची वर्षं देऊन गोकुळ दूध संघाचा लौकिक वाढवला, संघ एका उंचीवर नेऊन ठेवला. अनेक लोकांना इथे पदं देऊन मोठं केलं. हे सगळं विसरून काही लोकांनी आज वेगळा रस्ता धरला. त्यांच्यावर मला टीका करायची नाही. पण एवढं मात्र नक्की सांगायचं आहे की, माणूस मोठा होतो, समृद्धी येते, घर बदलतो, आयुष्य बदलतं.. सगळ्या गोष्टीत बदल होतो, पण माणूस आपला देव्हारा आणि त्या देव्हाऱ्यातला देव कधी बदलत नाही. आणि याचा विचार त्यांनी जरूर करावा. बाकी आमच्या सदिच्छा नेहमी त्यांच्यासोबत आहेत.”

यावेळी त्यांनी लोकांना आवाहन देखील केले की, आजपर्यंत तुम्ही आमच्या 3 नेत्यांवर जो विश्वास ठेवला तो इथून पुढेही कायम राहूदे. तुमच्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही ही आम्हा सर्वांची जबाबदारी आहे. गोकुळ दूध संघाचा कारभार दुधासारखाच पांढराशुभ्र व स्वच्छ आहे. यात घाण पडू देऊ नका , नाहीतर दूध नासायला वेळ लागत नाही. त्रिमूर्तींच्या नेतृत्वात आमचं गोकुळ चांगलंच चाललंय .. बाकी आपण सगळे सुज्ञ आहात..!