आजपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात, इंग्लंड आणि वेस्ट इंडीज संघांमध्ये रंगणार कसोटी सामना

इंग्लंड : इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडीज कसोटी मालिकेद्वारे जवळजवळ चार महिन्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला पुन्हा एकदा सुरुवात होत आहे. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्रिकेटच्या अनेक नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे यावेळी क्रिकेटचा अनुभव पूर्णत: वेगळा असेल. खेळाडूंना मैदानासह ते राहत असलेल्या हॉटेलवरही नियम पाळावे लागणार आहेत.

इंग्लंड आणि वेस्ट इंडीज संघांमध्ये आजपासून कसोटी मालिकेतील पहिल्या सामना साऊदम्पटनच्या एजेस बाऊद मैदानात खेळवण्यात येणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी साडेतीन वाजता सामन्याला सुरुवात होईल. विशेष म्हणजे क्रिकेटपटू मैदानात असले तरी कोरोना व्हायरसमुळे खबरदारी म्हणून त्यांना चिअर करण्यासाठी प्रेक्षक मात्र स्टेडियममध्ये नसतील.

मैदानावर कोणते नियम पाळावे लागणार?

– रिझर्व्ह खेळाडू बॉल बॉयचं काम करणार

 

– स्टम्प्स आणि बेल्स साफ करण्यासाठी ब्रेक घेणार

 

– पीपीई किट घालून पत्रकार आणि फोटोग्राफर्स मॅच कव्हर करणार

 

– केवळ दोन्ही संघाचे कर्णधार आणि सामनाधिकारी नाणेफेकीसाठी बाहेर जाणार

 

– नाणेफेकीदरम्यान कोणताही कॅमेरा नसेल किंवा शेकहॅण्डही केलं जाणार नाही

 

– पंच स्वत:च्या बेल्स घेऊन मैदानात जातील

 

– खेळाडू एकमेकांचे ग्लोव्ज, शर्ट, पाण्याची बाटली, बॅग किंवा स्वेटर वापरु शकणार नाहीत

 

– खेळाडू गळाभेट घेऊ शकणार नाहीत

 

ग्राऊंड स्टाफ मैदानावर खेळाडूंच्या 20 मीटरच्या कक्षेत जाणार नाही. इथे दोन चौरस फुटांच्या सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचं पालन करावं लागेल.

 

– स्कोअरर पेन किंवा पेन्सिल शेअर करु शकणार नाही

 

– आयसीसीने आधीच चेंडूवर लाळ लावण्यास बंदी घातली आहे. दोन इशाऱ्यानंतर पाच धावांचा दंड लावला जाईल.

 

– जर षटकारानंतर चेंडू स्टॅण्डमध्ये गेला तर ग्लोव्ज घातलेले खेळाडूच तो फेकू शकतात. इतर कोणालाही चेंडूला हात लावण्याची परवानगी नसेल.

 

– आठवड्यातून दोन वेळा खेळाडूंची कोरोना चाचणी होईल, तसंच खेळाडू हॉटेलबाहेर जाऊ शकणार नाहीत

 

याशिवाय खेळाडू ज्या हॉटेलमध्ये राहत आहेत तिथले दरवाजे एका अॅपद्वारे उघडण्याची सोय आहे, ज्यात हॅण्डला हात लावण्याची गरज नाही. तसंच खेळाडूंना कोणतीही रुम सर्विस नसेल किंवा लिफ्टही नसेल.

 

सामना कुठे पाहता येणार?
भारतात या मालिकेचं थेट प्रक्षेपण आज दुपारी साडेतीन वाजल्यापासून सोनी सिक्सच्या चॅनल्सवर केलं जाईल.