अत्याचार झालेल्या दलितांना सरकारने न्याय मिळवून द्यावा ; खा. संभाजीराजे

अत्याचार झालेल्या दलितांना सरकारने न्याय मिळवून द्यावा – खा. संभाजीराजे 

अरविंद बनसोड आणि काही दलित बांधवांवर झालेल्या अत्याचाराच्या बातम्या सध्या सर्वत्र येत आहेत.खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी यावेळी सरकारने दलित बांधवांना न्याय मिळवून दिला पाहिजे, असं वक्तव्य केलं आहे.खासदार संभाजीराजे यांनी फेसबुक पोस्टद्वारे याविषयीचं आपलं मत मांडलं आहे.

यावेळी फेसबुक पोस्टमध्ये छत्रपती म्हणतात की , “राजर्षी शाहूंचा वारसदार या नात्याने मला अजून एक गोष्ट नमूद करायची आहे, की या घटनांना दलित विरुद्ध मराठा असा रंग द्यायचा प्रयत्न कुणी करत असेल तर त्यांचा कुटील डाव उधळून लावला गेला पाहिजे. बहुजन समाजामध्ये फूट पाडून, जाती जातींमध्ये भांडणे लावून, स्वतःच्या राजकारणाची पोळी भाजून घ्यायला काही लोक पुढे सरसावत असल्याचे दिसून येत आहे. यामधून त्यांचं क्षुल्लक राजकारण साध्य होईल, पण समाजाचं मोठं नुकसान होणार आहे. म्हणून चौकशी अंती या घटनांमध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर तात्काळ अन कठोर कारवाई झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे.”

तसेच, “ज्या प्रमाणे मराठा समाजाने दलितांवर अन्याय केला नाही पाहिजे असे आम्ही म्हणतो, त्याच वेळी काही कायद्यांचा चुकीचा वापर करून मराठा समाजावर सुद्धा अन्याय झाला नाही पाहिजे. कुणावरही अन्याय होत असेल तर त्याचा तात्काळ विरोध मी नेहमी केला आहे आणि करत राहणार.. काही माथेफिरु लोक दोन्हीकडे असतात. त्या सर्वांना आपण बाजूला पाडलं पाहिजे. समाज हिताच्या दृष्टीने, बहुजन समाजाच्या एकीच्या दृष्टीने तेच योग्य आहे. देशाच्या सामाजिक एकात्मतेला सुरुंग लावणाऱ्या शक्तींचा वेळीच बंदोबस्त करण्यासाठी सरकार ने विशेष मोहीम राबवली पाहिजे.”

“छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या केवळ घोषणा देऊन काय उपयोग?
त्यांचे विचार आत्मसात करणे, त्याप्रमाणे वागणे महत्वाचे आहे.”अशी म्हणणे खासदार संभाजीराजे  मांडले आहे.