Upcoming festivals should be celebrated as 'Health Festival' - Guardian Minister Dr. Rajendra Shingane

येणाऱ्या काळातील उत्सव ‘आरोग्य उत्सव’ म्हणून साजरे करावेत – पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे

आगामी काळात बकरी ईद, गणेशोत्सव, मोहरम, पोळा, गौरी आदी महत्त्वाचे सण साजरे करण्यात येणार आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारच्या गृह विभागाने मार्गदर्शक तत्वे घालून दिली आहेत. त्याचे कटाक्षाने पालन सर्वांकडून झाले पाहिजे. आगामी काळात येणारा प्रत्येक उत्सव हा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ‘आरोग्य उत्सव’ म्हणून साजरा केला पाहिजे, असे आवाहन पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी आज केले. 

जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जि.प.अध्यक्षा मनिषा पवार, खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय गायकवाड, आमदार श्वेताताई महाले, जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील – भुजबळ उपस्थि‍त होते. तसेच यावेळी सभागृहात आमदार ॲड आकाश फुंडकर, माजी आमदार सर्वश्री शशीकांत खेडेकर, हर्षवर्धन सपकाळ, राहुल बोंद्रे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जालींधर बुधवत तसेच जिल्हास्तरीय शांतता समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थि‍त होते.

प्रशासनाने या काळात जिल्हा सीमांवरील तपासणी नाके अधिक सतर्क करण्याच्या सूचना करीत पालकमंत्री म्हणाले, त्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवला पाहिजे. या नाक्यांवर आरोग्य कर्मचारी राहतील याची काळजी घ्यावी. गणेश मंडळानी यावर्षी कोरोना संसर्ग पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करू नये. सार्वजनिक गणेशोत्सवाकरीता परवानगी देण्यात येणार नाही. सर्वांनी घरातच गणेशोत्सव साजरा करावा. तसेच बकरी ईदला मोठ्या प्रमाणात कुर्बानी दिली जाते. परंतु यावेळस कोणत्याही प्रकारची कुर्बानी देवू नये. ईदची नमाजही घरातच अदा करावी. आपापल्या परि‍सरात या उत्सवांच्या काळात आरोग्य शिबिरे घ्यावीत, उत्सवाचे स्वरूप खूप साधे ठेवावे, गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच मास्क लावणे, शारीरिक अंतर ठेवणे हे नियम पाळणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणजे कोरोनाचा संसर्ग पसरणार नाही.

यावेळी खासदार प्रतापराव जाधव म्हणाले, गर्दीची ठिकाणे टाळावीत. प्राधान्यक्रमाने कामाचे स्वरुप ठरवावे. अनावश्यक गर्दी होऊ देवू नये. कोणत्याही प्रकारचा नकारात्मक संदेश जनतेपर्यंत पोहोचणार नाही याविषयी पोलीस प्रशासनाने काळजी घ्यावी. जनतेनेही प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. आमदार संजय गायकवाड यांनी आगामी काळातले उत्सव घरातल्या घरात साध्या पद्धतीने साजरे करा तसेच जनतेने लॉकडाऊन संदर्भातले आदेश काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन  केले.  

जिल्ह्यात शनिवार व रविवार संपूर्ण संचारबंदी ठेवण्याबाबत किंवा आठवडी बाजाराच्या दिवशी कडक कर्फ्यु ठेवण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.