87 thousand 681 patients of Corona are undergoing treatment in the state - Health Minister Rajesh Tope

कोरोनामुक्तीसाठी आरोग्यमंत्री व गृहमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

आषाढी एकादशीची वारी आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पंढरपूरला भेट देऊन सुरक्षा व आरोग्य व्यवस्थेची पाहणी केली.

महाव्दार चौकातून दर्शन घेताना गृहमंत्र्यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठलाला कोरोनामुक्तीचे साकडे घातले. “विठू माऊली तू माऊली जगाची, आर्त साद तुज ही कोरोनामुक्तीची” असे सांगत संपूर्ण जगातून, भारत व महाराष्ट्रातून या कोरोनाला घालव आणि शतकांपासून चालत आलेली वारीची परंपरा पूर्ववत लवकरच सुरू होण्यासाठी आशिर्वाद असू द्या” या शब्दांत हे साकडे घातले.

पालखी सोहळ्याबाबत शासनस्तरावर घेण्यात येणारा निर्णय नागरिक आणि भाविकांच्या हिताचा असेल. त्या निर्णयाबाबत भाविकांनी व जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन गृहमंत्री श्री. देशमुख यांनी यावेळी केले. गृहमंत्री श्री. अनिल देशमुख यांना वीणा, वारकरी पारंपरिक पोशाख, तुळशी हार देण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारीच्या अनुषंगाने सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी गृहमंत्र्यांना दिली. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे,आ.भारत भालके उपस्थित होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी आणि जनतेने आरोग्याच्या दृष्टीने पंढरपुरात येऊ नये. घरातूनच श्री विठ्ठलाचे नामस्मरण व पूजा करण्याचे आवाहन सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर,अतिरिक्त पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, प्रांताधिकारी सचिन ढोले, मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी आदी उपस्थित होते.