rahul dravid

एम टीव्हीवाले राहुल द्रविडला बकरा करायला गेले होते आणि एम टीव्हीचाच बकरा झाला.

राहुल द्रविडची तपश्चर्या भंग करायला एम टीव्हीनं अप्सरेला पाठवलेलं

राहुल द्रविड! त्याची ओळख ‘लास्ट जंटलमन ऑफ क्रिकेट’ अशी आहे. आजकाल अभावाने आढळणारा संयम हा त्याचा सर्वात मोठा गुण होता.

ऋषीमुनींच्या संयमाने तो मैदानावर उतरायचा. स्लेजिंग वगैरे करून त्याची एकाग्रता भंग करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला मात्र या भिंतीला हलवणे कोणालाच शक्य व्हायचे नाही. त्याची बॅट त्याच्या पेक्षा जास्त बोलायची. त्याच्या क्लासवर अनेकजन तेव्हा फिदा होते. आजही त्याची लोकप्रियता कमी झाली नाही.

आज अर्ध्या हळकुंडाने वेस्ट इंडियन झालेले पांड्यासारखे खेळाडू मैदानापेक्षा कॉफी विथ करण सारख्या शोमध्ये मुलींवर अश्लील कमेंट करून जास्त प्रसिद्धी मिळवत आहेत. आयपीएलच्या झगमगाटामध्ये मिळालेल्या पैशाचा माज त्यांच्या स्वभावा मधून दिसत आहे. अशावेळी द्रविड सारख्या क्लास खेळाडूची आठवण आल्याशिवाय राहात नाही.

खूप वर्षापूर्वी स्टिंग ऑपरेशनचा काळ आठवतोय काय? छुपे कॅमेरे नुकतेच भारतात आलेले. मॅच फिक्सिंग पासून शक्ती कपूरपर्यंत अनेकजन यात उघडे झालेले. याच छुप्या कॅमेराला घेऊन एम टीव्ही बकरा नावाची एक सिरीयल टीव्हीवर लागायची.

आज युट्युबवर ज्यांचा सुळसुळाट झाला आहे अशा प्रँक व्हिडीओची ती जननी होती. या सिरीयलवाल्यांनी एकदा राहुल द्रविडची तपश्चर्या भंग होते का हे बघण्यासाठी एका मेनकेला पाठवलं होत.

सायली भगत माहितीय? एकेकाळी मिस इंडियाचं टायटल जिंकलेली हॉट सुपरमॉडेल आणि इम्रान हाश्मी बरोबर ‘वो अजनबी’ गाण्यामध्ये ठुमके देणाऱ्या सायली भगतला एम टीव्हीने राहुल द्रविड नामकची कसोटी बघायला पाठवले होते.

सिंगापूरवरून आलेल्या एका पत्रकाराच रूप घेऊन सायलीने राहुलची मुलाखत घेतली. मुलाखत झाल्यावर तिने कॅमेरामनला थोडावेळ बाहेर जाण्यासाठी सांगितले. कॅमेरामन निघून गेला पण पूर्ण रूमभर हिडन कॅमेरे लपवण्यात आलेले.

राहुल द्रविडला सायली म्हणाली मी तुझी खूप मोठी फॅन आहे. ती त्याच्या कॉलेजच नाव सांगून काही तरी गप्पा मारू लागली. गप्पा मारता मारता त्याच्याशेजारी येऊन बसली. राहुल अभावितपणे तिच्यापासून लांब सरकला. अचानक सायली त्याच्याशी जवळीक साधायचा प्रयत्न करत म्हणाली प्लीज माझ्याशी लग्न कर.

राहुल द्रविड तिथून ताड करून उठला आणि तिला लांब ढकलून बाहेर जाण्याचा प्रयत्न करू लागला.

रूम मध्ये गोंधळ सुरु झाला. सायली आपल्या वडिलाना बोलवले आणि त्यांना राहुलला समजावून सांगायला सांगितले. आता मात्र हद्द झाली. कधी नव्हे ते द्रविड रागाने लाल झालेला. तो तिच्या वडिलावरही आरडाओरडा करू लागला. त्याला कसबस शांत केलं गेलं त्यावेळी तिचा बाबा झालेल्या नटाला राहुल बजावत होता पोरगीला कॉलेजमध्ये अभ्यासाकडे लक्ष द्यायला सांगा.

एम टीव्हीवाले राहुल द्रविडला बकरा करायला गेले होते आणि एम टीव्हीचाच बकरा झाला.

राहुल द्रविडने मैदानावर आणि मैदानाबाहेर आपली मर्यादा जपली. त्याच्याही फिमेल फॅन फॉलोअर्सची संख्या कमी नव्हती पण कधीही त्याचे नाव गॉसिप मगझीनमध्ये कोणाशीही जोडले गेले नाही अथवा चुकीच्या कारणाने तो चर्चेत आला नाही.

आयुष्यभर त्याने एकाच मुली वर प्रेम केले. तिचे नाव विजेता पेंढारकर.

बेंगलोरमध्ये या दोघांची पण फॅमिली मराठी भाषिक असल्यामुळे खास दोस्त. यामुळे राहुल आणि विजेता सुद्धा लहनपणी चांगले मित्र बनले. विजेता आणि तिच्या घरचे काही वर्षातच नागपूरला परत आले .तरही दोघांच्या मैत्रीत खंड पडला नाही.

राहुल कॉलेजमध्ये असतानाच क्रिकेटमध्ये मोठ्ठ नाव कमवत होता तेव्हा विजेता नागपूरमध्ये वैद्यकीय शिक्षण पूर्ण करत होती. लॉंग डीस्टन्स असून सुद्धा दोघांची प्रेमकहाणी फुलली. पुढे द्रविड भारतीय क्रिकेटचा सुपरस्टार झाला.

अनेक पोरी त्याच्यावर जीव ओवाळून टाकत होत्या पण राहुल शेवटी नागपूरचाच जावई झाला.