nimbalkar

मराठा आरक्षणाच्या समर्थनात कोल्हापूरचे जि.प.सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर यांचा राजीनामा

मराठा समाजाच्या समन्वयकांकडे दिला राजीनामा, यापुढे समाज जो ठरवेल ती माझी भूमिका असेल, असेही ते यावेळी म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाच्या त्रिसदस्यीय खंडपीठाने १० सप्टेंबरला नोकरीतील १३ टक्के व शिक्षणातील १२ टक्के असलेल्या मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती देऊन सर्व याचिका घटनापीठाकडे वर्ग केल्या आहेत. आरक्षणासंदर्भात अंतिम निकाल झाला नसला तरी स्थगिती देण्यात आल्याने मराठा युवक, युवती, विध्यार्थांचे प्रवेश व इतर सवलती थांबल्या आहेत. आरक्षणाच्या मुद्यावर राज्यसरकारवर विविध मराठा संघटनाकडून दबाव वाढत चालला आहे. जयसिंगपूर येथे मराठा मराठा आरक्षणाच्या विषयावर रास्ता रोको होता, त्यावेळी तेथे उपस्थित असलेले कोल्हापूरचे भाजपचे जि.प.सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी मराठा समाजाच्या समन्वयकांकडे राजीनामा दिला. यावेळी बोलताना राजवर्धन निंबाळकर म्हणाले, मोठ्या संघर्षातून मराठा समाजाने मिळवलेल्या या आरक्षणाला जर धक्का लागला तर समाजाचा पुन्हा उद्रेक होईल. मराठा समाजाला सुप्रिम कोर्टात न्याय मिळवून न दिल्यामुळे सरकारला समाजाच्या आक्रोशाला सामोरे जावे लागेल. सरकारने मराठा आरक्षण या विषयावर गंभीर होणे गरजेचे आहे. आरक्षणाला स्थगिती मिळाल्या नंतर लगेचच सरकारकडून १२००० पोलीस शिपाई भरतीची जाहिरात काढण्यात आली. आधी आरक्षण आणि मगच भरती हीच मराठा समाजाची भूमिका आहे. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे मराठा समाजाच्या 13% जागा सोडून पोलीस भरती काढू, असं बोलणं म्हणजे समाजाच्या डोळ्यात धूळफेक केल्याचा प्रकार आहे. म्हणजे सरकारला आरक्षणाचा मुद्दा निकाली काढायचा नाहीये का? अशी शंका लोकांना येत आहे. यापुढे कोणत्याही प्रकारची सरकारी नोकर भरती काढली जाऊ नये, मग ती पोलीस भरती असो की ‘एम पी एस सी’ ची किंवा आणखी कुठलीही परीक्षा असो मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय निकाली लागल्या शिवाय भरती नको. मराठा समाज इतर कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही हे मी पुन्हा पुन्हा सांगतोय. इतर सर्व समाज मराठा समाजाच्या सोबत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वंशजांनी सुद्धा मराठा समाजाच्या आरक्षणाला सरकारने प्राधान्य द्यावं हीच भूमिका घेतली आहे. त्यांचे मी समाजाच्या वतीने जाहीर आभार व्यक्त करतो. सरकारने पोलीस भरतीचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा. ही समाजाच्या वतीने विनंती वजा सूचना आहे. मी समाजाचा घटक या नात्याने जबाबदारी पूर्वक सांगू इच्छितो की, समाजाने टाकलेल्या विश्वासाला गृहीत धरून कुणी दगा फटका करत असेल तर त्यांना त्याची जबर किंमत मोजावी लागेल. यापुढे समाज जो ठरवेल ती माझी भूमिका असेल, असेही ते यावेळी म्हणाले.