Lockdown in Maharashtra

राज्यात लॉकडाऊन 1 जूनपर्यंत वाढवला; नवी नियमावली जारी

मुंबई – राज्यातील (Maharashtra) कोरोनाच्या (Corona) वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर ब्रेक द चेन (Break The Chain) अंतर्गत असलेले निर्बंध 1 जूनपर्यंत वाढवण्यात आले आहेत. राज्य सरकारने (Maharashtra Government) यासंदर्भातील नियमावलीही जारी केली आहे. परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटी पीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश जारी करण्यात आला आहे. बुधवारी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी माहिती दिली होती. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये काही निर्बंध वाढवण्यात आले आहेत. 15 मे रोजी सकाळी सात वाजल्यापासून ते 1 जून सकाळा 7 वाजेपर्यंत हे नवे निर्बंध लागू राहणार आहेत.

ब्रेक द चेनच्या नव्या नियमावलीनुसार राज्यात प्रवेश करण्यासाठी आरटीपीसीआर टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह असणं बंधनकारक आहे. तसंच तो रिपोर्ट 48 तास आधीचा असायला हवा. संवेदनशील भागातील कडक निर्बंध हे जुन्या आदेशानुसार असणार आहे. कारमधून दोन पेक्षा जास्त लोकांना प्रवास करता येणार नाही.

लॉकडाऊनच्या या काळात दुध व्यवसाय करणाऱ्यांना तसंच घरपोच सेवा देणाऱ्यांसाठी सूट देण्यात आली आहे. परराज्यातून माल वाहतूक करणाऱ्या गाड्यांमध्ये फक्त दोनच जणांना प्रवास करता येईल. त्यांना आरटीपीसीआर टेस्ट करावीच लागणार आहे. दुकानांसह इतर व्यवसायांसाठी वेळही देण्यात आली आहे.

किराणा मालाची दुकाने, दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री, भाजीपाला विक्री, फळे विक्री, अंडी,मटण, चिकन,मासे विक्री, कृषी संबंधित सर्व सेवा / दुकाने, पशूखाद्य विक्री, बेकरी, मिठाई दुकाने, सर्व प्रकारची खाद्य पदार्थ दुकाने, पाळीव प्राण्यांची खाद्य दुकाने, येणाऱ्या पावसाळ्याशी संबंधित वस्तूंची दुकाने ही सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरु राहणार आहेत.