Harjas Sethi

‘Work From Home पुरे, ऑफिसला या’; कंपनीच्या मेलनंतर तरुणीची प्रतिक्रिया बघा

नवी दिल्ली – कोरोना व्हायरसमुळे गेल्या वर्षभरात लोकांच्या दैनंदिन जीवनात अनेक बदल झाले. कामानिमित्त घराबाहेर असणाऱ्यांपैकी काहींना तर घरातूनच काम करावं लागत आहे. आता कोरोनाचं प्रमाण हळूहळू कमी होत आहे. तर दुसऱ्या बाजुला वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांना घरात बसून काम करण्याची सवयच झाली आहे. यातच आता काही कार्यालये सुरु झाली असून लोकांना पुन्हा कामावर येण्यास सांगितलं जात आहे. मात्र काही ठिकाणी कर्मचाऱ्यांना घरातूनच काम करणं सोयीचं आणि बरं वाटू लागलं आहे. त्यामुळे काहींची प्रतिक्रिया थोडीशी नाराजीची अशीच आहे.

सध्या सोशल मीडियावर एका तरुणीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ऑफिसमधून आलेल्या मेलनंतर तिने व्यक्त केलेलं मत यामध्ये आहे. हरजस सेठी असं तिचं नाव असून ऑफिसमध्ये परत या असं सांगणारा मेल आला तेव्हा मी थरथर कापायला लागले असं तिने म्हटलं आहे. अर्थात तिने मनातलं बोलून दाखवलं असलं तरी एक गंमत म्हणून हा व्हिडिओ तयार केला होता असंही शेवटी म्हटलं. हरजसने व्यक्त केलेल्या भावना आपल्याच असल्याचं सांगत अनेक युजर्सनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये ती सांगते की, माझ्यासोबत खूपच धक्कादायक घटना घडली आहे. तीन दिवसांपूर्वी ऑफिसमधून मेल आला. त्यात रिटर्न टू वर्क असं सब्जेक्ट आहे. अरे याचा अर्थ काय? म्हणजे आता अंथरुणातून उठायचं, अंघोळ करायची आणि तयार होऊन ऑफिसला जावं लागणार, लोकांची तोंडं बघायची? अजुन त्यांनी मला ऑफिसमध्ये बोलावलं नाही, फक्त विचारलं आहे की तुम्हाला कसं वाटतं.. पण मी आताच थरथर कापत आहे.

हरजस पुढे म्हणते की, सिंहाच्या तोंडाला आता रक्त लागलं आहे आणि आता हे शक्य नाही. म्हणजेच आता वर्क फ्रॉम होमची सवय लागलीय, ऑफिसला येणं कठीण वाटतंय. एखाद्या कुत्र्याला हड्डी दिली आणि त्याच्याकडून काढून घ्यायचा प्रयत्न केला तर ते गुरगुरणारच ना? असंही तिने म्हटलं आहे. शेवटी हरजसने तिच्या बॉसला एक विनंतही करताना म्हटलं की, मी हा व्हिडिओ फक्त मनोरंजन म्हणून केलाय. सध्या मार्केटमध्ये जॉब नाहीत त्यामुळे मला काढू नका. तुम्ही म्हणाल तेव्हा कामावर येईन.

हरजसने तिचा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. तिथून एका युजरनं ट्विट केला आणि तो खूप व्हायरल झाला. तिला अचानक मित्राचा फोन आला की, तुझा व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल झाला आहे. त्यावेळी हरजसने ट्विटर अकाउंट सुरु केलं आणि व्हिडीओ पाहिला. इन्स्टाग्रामवर तिच्या ऑफिसच्या लोकांनीसुद्धा तिचा व्हिडिओ पाहिला. अर्थात या व्हिडिओवर ऑफिसच्या लोकांनी कोणतीही नकारात्मक प्रतिक्रिया दिलेली नाही.

व्हिडीओबद्दल बोलताना हरजस सेठी म्हणाली की, लोकांनी गेल्या वर्षी मार्चपासून वर्क फ्रॉम होम करण्यास सुरुवात केली. लोकांना आता याची सवयच लागली आहे. जेव्हा समजलं की, आता ऑफिसला जावं लागणार त्यावेळी ज्या मनात भावना आल्या त्या लोकांसोबत शेअर केल्या. मलाही अजुन ऑफिसला बोलावलेलं नाही तर त्यांनी एक सर्वे केला की कर्मचारी वर्क फ्रॉम होम किंवा ऑफिसबद्दल काय विचार करतात.