sanjay-padwal

साळवणमध्ये रोगप्रतिकारक शक्तिवर्धक औषधाचे वाटप

गगनबावडा (वैष्णवी पाटील) : कोल्हापूर शहर व ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा वाढता प्रसार पाहता श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान चे मठाधिपती परम पूज्य श्री अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व साळवणचे सरपंच संजय पडवळ आणि हनुमान तालीम मंडळ यांच्यावतीने  साळवणमध्ये औषध आपल्या दारी या कार्यक्रमांतर्गत रोगप्रतिकार शक्तिवर्धक औषधाचे वाटप करण्यात आले. श्री क्षेत्र सिध्दगिरी कणेरी मठ यांच्यावतीने जिल्ह्यातील लोकांसाठी हा इम्यूनिटी बुस्टर डोस उपलब्ध करून दिला जात आहे. त्याचे वाटप प्रत्येक ग्रामपातळीवर झाल्यास कोरोनाविरूध्दच्या लढाईला बळ मिळणार असल्याचे मत यानिमित्ताने साळवणचे सरपंच संजय पडवळ यांनी व्यक्त केले.

1 लिटर शुद्ध पाण्यामध्ये १२ थेंब हे रोगप्रतिकार शक्तिवर्धक औषध मिक्स करून देण्यात आले. पाण्यासाठी आवश्यक असणाऱ्या शुद्ध पाण्याच्या बाटलीचा खर्च स्वतः संजय पडवळ यांनी केला असून, साळवणमधील जवळजवळ ५० कुटुंबातील २०० लोकांना हे शक्तिवर्धक औषध यावेळी वाटप करण्यात आले.

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांची प्रतिकारक क्षमता वाढवणे आणि ती टिकवून ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे. कणेरी मठाच्यावतीने देण्यात येणाऱ्या इम्यूनिटी बुस्टर डोस मुळे लोकांची प्रतिकारक्षमता वाढीस लागत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे घरोघरी प्रत्येकानी त्यांच्या वयोमनानुसार याचे सेवन केल्यास त्याचा चांगला फायदा होत असल्याचे, कणेरी मठाच्यावतीनेही सांगण्यात आले आहे.