थेट-पाईपलाईन

थेट पाईपलाईन पुर्ण झाली असती …तर कोल्हापूर तहानलं नसतं

कोल्हापूर:  शहराला पाणीपुरवठा करणार्‍या पंचगंगा व भोगावती नदीवरील उपसा केंद्रांना दरवर्षी महापुराचा विळखा पडतो. परिणामी शहरातील पाणीपुरवठा बंद झाल्याने शहरवासीयांच्या घशाला कोरड पडली आहे. थेट पाईपलाईन वेळेत पूर्ण झाली असती तर कोल्हापूर तहानलं नसतं, हे वास्तव आहे. वास्तविक 2016 मध्येच थेट पाईपलाईन योजना पूर्ण होऊन शहरवासीयांना पाणी मिळायला पाहिजे होते.

परंतु प्रत्यक्षात 2021 साल संपत आले तरीही अद्याप पाणी मिळालेले नाही. शहराच्या उशाला नदी वाहते; पण शहरवासीयांना प्यायला पाणी नसल्याचे वास्तव आहे. कोल्हापूरसाठी स्वच्छ व मुबलक पाणी मिळावे यासाठी तब्बल पाचशे कोटींची थेट पाईपलाईन योजना मंजूर झाली. परंतु गेली सात वर्षे योजनेचे काम संथगतीने सुरू आहे.

…तर कोल्हापूर तहानलं नसतं!

2019 व 2021 या दोन महापुराचे अनुभव आता गाठीशी आहेत. कोल्हापूरकर अक्षरशः पाण्यासाठी तडफडत आहेत. पाण्यासाठी दारोदारी भटकंती करत आहेत. पाणी विकत घेऊन पिण्याची वेळ आली आहे. अनेक झोपडपट्टीवासीयांना कूपनलिका असलेल्या कुटुंबीयांच्या दारात पाण्यासाठी याचना करावी लागत आहे. थेट पाईपलाईनमधून पाण्याची आणखी किती वर्षे वाट पाहायची, असा प्रश्न शहरवासीयांतून विचारला जात आहे. कागदी घोड्यांचा खेळ करणार्‍या महापालिका प्रशासनाने ठेकेदार कंपनीवर ठोस कारवाईची पावले उचलून लवकर योजना पूर्ण करून घेणे आवश्यक आहे.

महापुरासाठी पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फूट आहे. धोका पातळी 43 फूट आहे, हे ओळखूनच कोल्हापूर शहरासाठी पाणी उपसा करणारी उपसा केंद्रे (पंपिंग स्टेशन) तब्बल 48 ते 50 फुटांवर बांधण्यात आली. यात पंचगंगा नदीवरील शिंगणापूर उपसा केंद्र, भोगावती नदीवरील बालिंगा व नागदेववाडी उपसा केंद्रांचा समावेश आहे. परंतु सद्य:स्थितीत या उपसा केंद्रांना महापुराचा विळखा पडत आहे. परिणामी

पंचगंगा व भोगावती नदीतून शहराला पाणीपुरवठा करणारी केंद्रेच बंद पडली आहेत. 2019 मध्ये तब्बल 22 दिवस पाणीपुरवठा बंद होता. यंदा 23 जुलैपासून कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठा बंद आहे. काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईनद्वारे कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा झाल्यास भविष्यात महापुरासारखी नैसर्गिक आपत्ती ओढवली तरी शहराचा पाणीपुरवठा खंडित होणार नाही.