Team India

‘या’ पाच कारणांमुळे झाला टीम इंडियाचा लाजीरवाणा पराभव IND vs ENG :

चेन्नई, 09 फेब्रुवारी: भारत विरुद्ध इंग्लंड या दोन संघात (India vs England) होणाऱ्या चार कसोटी सामन्याच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने सरशी केली आहे. इंग्लंडने भारताचा 227 धावांनी दारुण पराभव करत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. चेन्नई येथे झालेल्या पहिल्या सामन्यात अनेक चढ उतार आले. चौथा दिवस वगळता इंग्लंड सुरुवातीपासून भारतीय संघासाठी वरचढ ठरली. इंग्लंडचा कर्णधार जो रुटने पहिल्या डावात शानदार द्विशतक झळकावत इंग्लंडचा पाया मजबूत केला होता. इंग्लंडने पहिल्या डावात 190.1 षटकांत 578 धावांचा डोंगर उभा केला होता. त्यानंतर इंग्लंडच्या बॉलर्सनी भारताला सावरण्याची संधीच नाही दिली. इंग्लंडचा भारतीय जमिनीवरचा हा सगळ्यात मोठा विजय आहे, तर 22 वर्षात पहिल्यांदाच भारताचा चेन्नईच्या मैदानावर पराभव झाला. टीम इंडियाच्या या लाजिरवाण्या पराभवाची 5 महत्त्वाची कारणं ठरली.

रहाणे आणि रोहितचा फ्लॉप शो

अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्माचा चेन्नईच्या खेळपट्टीवरील फ्लॉप शो हा भारताच्या पराभवाचं मोठं कारण आहे. भारताचे हे दोन दिग्गज फलंदाज दोन्ही डावात काहीही करू शकले नाहीत. रोहित शर्माने पहिल्या डावात 6 धावा आणि दुसऱ्या डावात 12 धावा केल्या. तर रहाणेला पहिल्या डावात 1 धाव आणि दुसऱ्या डावात खातंही उघडता आलं नाही. दोघांच्या फलंदाजीत बऱ्याच त्रुटी आढळल्या, ज्याचा इंग्लंडने भरपूर फायदा घेतला.

विराट कोहलीला सूर गवसला पण…

विराट कोहली पहिल्या डावात जवळपास 70 मिनिटे मैदानावर होता. पण त्याला फारशी चांगली खेळी साकरता आली आहे. पहिल्या डावात फलंदाजी करताना त्याचा आत्मविश्वास फारचं कमी असल्याचं दिसलं.  48 चेंडूत केवळ 11 धावा करत विराट बाद झाल्याने मधल्या फळीवर दबाव निर्माण झाला. दुसऱ्या डावात विराटला सूर गवसला मात्र तो भारताला जिंकून देवू शकला नाही. दुसऱ्या डावात त्याने 104 चेंडूत 72 धावा केल्या.

खराब कॅप्टन्सी आणि टीम निवड

या सामन्यात विराट कोहलीने अनेक अजब निर्णय घेवून सर्वांना चकित केलं आणि हेच भारताच्या पराभवाचे कारण बनलं. सामना सुरू होण्यापूर्वीपासूनचं कोहलीने घेतलेल्या निर्णयावर आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विराटने कुलदीप यादवऐवजी शाहबाज नदीमला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली. शहाबाज नदीमने संपूर्ण कसोटी सामन्यात 233 धावा दिल्या आणि फक्त 4 गडी बाद केले. याशिवाय वॉशिंग्टन सुंदरलाही संघात स्थान मिळालं, ज्याला अष्टपैलू खेळाडू म्हणून संधी देण्यात आली होती. तो फक्त फलंदाजीच करू शकला, पण गोलंदाजीत तो पूर्णपणे फ्लॉप ठरला.

भारताच्या 8 खेळाडूंना 15 धावांचा टप्पाही ओलांडता आला नाही

दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघासमोर 420 धावांच लक्ष्य होतं. एवढ्या मोठ्या धावांचा पाठलाग करताना, प्रत्येक खेळाडूकडून संयमाची खेळी अपेक्षित होती. मात्र विराट कोहली आणि शुभमन गिल वगळता एकाही भारतीय खेळाडूल 15 पेक्षा अधिक धावा करता आल्या नाहीत.

गोलंदाजांकडे काहीही प्लॅन नव्हता

चेन्नईच्या खेळपट्टीवर पहिले दोन दिवस भारतीय गोलंदाजांसाठी खूपच अडचणीचे ठरले. जो रुटने स्वीप शॉटने भारतीय फिरकीपटूंना बराच त्रास दिला आणि द्विशतकाला गवसणी घातली. गोलंदाजांकडे इंग्लंडच्या फलंदाजांना कसं बाद करायचं याची कसलीही योजना दिसली नाही. दुसर्‍या डावात गोलंदाजांनी पुनरागमन केलं पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता.