Gokul Election

कोल्हापूरच्या कोरोना परिस्थितीला गोकुळ निवडणूक जबाबदार?

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाचा कहर काही केल्या थांबायचे नाव घेत नाही. जिल्ह्यात गेल्या २४ तासात कोरोनाचे नावे १२४९ रुग्ण सापडले असून हा आकडा महाराष्ट्रात सर्वाधिक आहे, त्यामध्ये ३९ लोकांचा मृत्यू झाला आहे. मागील दोन महिने दररोज १००० च्या वर कोरोनाचे रुग्ण कोल्हापूरमध्ये सापडत आहेत,  गेल्यावर्षी जिल्हा प्रशासनाने तडाखेबंध काम केले होते पण दुसऱ्या लाटेमध्ये प्रशासन कोरोना रोखण्यात अपयशी ठरत आहे.

एप्रिलच्या मध्यापर्यंत आटोक्यात असणारा कोरोना १५ एप्रिल नंतर वाढू लागला त्याला थांबवण्यात प्रशासनाला अध्याप यश आलेले नाही. कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये ग्रामीण भाग या कोरोनापासून थोडा लांब राहिला पण कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या भरपूर आहे. पहिल्या लाटेत गावच्या वेशीवर कोरोनाला रोखण्यात प्रशासन आणि ग्रामस्थ यशस्वी झाले होते पण दुसऱ्या लाटेमध्ये गावागावात कोरोनाचा सहज प्रवेश झाला. कोल्हापुरातील या परिस्थितीला गोकुळ निवडणूक कारणीभूत ठरल्याचे नागरिकांचे मत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील इतर सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्याने, गोकुळची निवडणूक पुढे ढकलावी म्हणून त्यावेळची सत्ताधारी आघाडी सर्वोच्च न्यायालयात गेली होती, पण कोल्हापूर जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयातील निकाल कायम केला आणि गोकुळच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला.

गोकुळच्या निवडणुकीच्या घोषणेनंतर दोन्ही बाजूंनी आघाडीची घोषणा झाली. त्यातच राज्य सरकारने १५ एप्रिल पासून राज्यात लॉकडाऊन घोषित केला होता, पण गोकुळची निवडणूक जाहीर झाल्यामुळे नेत्यांना प्रचारासाठी ठरावधारकांना भेटणे अनिवार्य झाले. त्याचाच परिपाक म्हणून बरेच ठरावधारकांना कोरोना झाला, पहिल्या लाटेत गावच्या वेशीवर कोरोनाला रोखण्यात यशस्वी ठरलेली अनेक गावे कोरोनाबाधित झाली, एकीकडे रुग्णसंख्या वाढत होती तर दुसरीकडे ऑक्सिजन, रेमडेसिवीरचा तुटवडा होता. यामुळे बऱ्याच लोकांना आपला प्राण गमवावा लागला. कोल्हापूरचा मृत्यूदर देशात सर्वाधिक आहे हे आलेल्या आकडेवरून स्पष्ट झाले, या सर्व परिस्थितीला गोकुळची निवडणूक जबाबदार असल्याचे लोकांमध्ये चर्चा रंगली. सामाज माध्यमातून देखील जिल्ह्यातील नेते मंडळीना जाब विचारला गेला.

राज्यातील जवळजवळ सर्वच जिल्ह्यातील परिस्थिती सुधारत असताना कोल्हापूरची परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोल्हापूरचा दौरा केला, पण या भेटीवेळी त्यांनी लोकांनाच या गोष्टीसाठी जबाबदार ठरवले आणि निर्बंध कडक करण्याची सूचना केली. अगोदरच लॉकडाऊन मुळे मेटाकुटीस आलेल्या व्यावसायिकांना याचा जोरदार फटका बसत आहे.

लोकांच्या आर्थिक, मानसिक नुकसानीला गोकुळ निवडणूक जबाबदार आहे कि काय असाच प्रश्न या परिस्थितीमुळे जनतेसमोर उभा राहिला आहे.