gokul

‘गोकुळ’कडून दूध उत्पादकांना २२ कोटींचा फटका

आकड्यांचा खेळ; दूध फरकातून प्रतिलिटर ५० पैसे कपातीचा आरोप

कोल्हापूर, ता. २६ : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाने (gokul) दूध बिल फरक म्हणजे एका हाताने रक्‍कम दिली आणि दुसऱ्या हाताने डिबेंचर (संस्था खर्च) म्हणून काढून घेतली आहे. चालू वर्षी ‘गोकुळ’ने जाहीर केलेल्या दूध दर फरक रकमेतून प्रतिलिटर ५० पैसे प्रमाणे डिबेंचर रक्‍कम संस्थेला विश्‍वासात न घेता परस्पर कपात केल्याचा आरोप सडोली खालसा (ता. करवीर) येथील निवास बेलेकर, काशीनाथ गायकवाड यांनी पत्रकाद्वारे केला आहे.

‘गोकुळ’चे २०२०-२१ मध्ये म्हैस व गाय एकूण दूध संकलन ४४ कोटी ६२ लाख लिटर इतके झाले आहे. त्याची रक्‍कम प्रतिलिटर ५० पैसे प्रमाणे २२ कोटी ३१ लाख रुपये होते ही रक्‍कम संघाने संस्थेच्या डिबेंचर्स खाती जमा केलेली आहे. यावर्षी अतिवृष्टी, महापूर, कोरोणा महामारी यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यासाठी शासनाकडून अल्प प्रमाणात मदत चालू आहे. मात्र उलट गोकुळ दूध संघाने दूध उत्पादक सभासदांना मदत करण्याऐवजी प्रतिलिटर ५० पैसे प्रमाणे रक्कम दूध उत्पादक सभासदाच्या दूध दर फरक रकमेतून कपात करून घेतली आहे.

आज दिवाळीच्या तोंडावर दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्काचे २२ कोटी ३१ लाख रुपये संघाने संस्थेच्या डिबेंचर्स खाती वर्ग करून आर्थिक संकटात असणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्याला परत आर्थिक संकटात घालण्याचे काम आज गोकुळकडून केले जात आहे, याची गोकुळ दूध संघ व्यवस्थापनाने दखल घेऊन
डिबेंचरपोटी जमा करून घेतलेली रक्‍कम लवकरात लवकर संस्थेच्या चालू खात्यावर अदा करून दूध उत्पादकांची दिवाळी गोड करावी. ही रक्‍कम दिवाळीच्या आत अदा नाही केली तर दूध उत्पादक सभासदांचे आंदोलन केले जाईल असा इशारा पत्रकात दिला आहे. पत्रकावर संजय पाटील (रा. बाचणी), कृष्णात मगदूम (सडोली खालसा) आदींच्या सह्या आहेत.

कोल्हापूरच्या पालकमंत्री पदावरून काँग्रेस-राष्ट्रवादीत चढाओढ

Follow us – 

ADVERTISEMENT –

Gadre Tea Company
Gadre Tea Company