Dhananjay Mahadik

महाडिक कुटुंबीय आणि भाजप-ताराराणी आघाडीने उभारले १२५ ऑक्सिजन बेडचे मोफत कोविड सेंटर

कोल्हापूर – संकट कोणतेही असो महाडिक कुटुंब कोणत्या ना कोणत्या मार्गाने लोकांची मदत करत असतात. माजी खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) सध्या आपल्या कामामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट अत्यंत वेगाने पसरली आहे. राज्यातील आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण आला असून ऑक्सिजन, बेड सर्वच गोष्टींची कमतरता जाणवत आहे. आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी ज्या कोणाला शक्य असेल त्याप्रमाणे तो मदत करत आहे. कोरोना रुग्णांच्या सोयीसाठी अनेक ठिकाणी कोविड सेंटर उभारली जात आहेत. कोल्हापूरमध्ये महाडिक कुटुंबीयांनी आणि भाजप-ताराराणी आघाडीच्या माध्यमातून व कोल्हापूर महानगरपालिका यांच्या सहकार्याने १२५ ऑक्सिजन बेडचे मोफत कोविड सेंटर उभारले आहे. आरोग्य विभागाच्या सर्व तांत्रिक बाबी पूर्ण करून हे कोविड सेंटर लोकांच्या सेवेत दाखल होत आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेतही त्यांनी केली होती मदत

मागील वर्षी सुद्धा कोरोनाच्या पहिल्या लाटेत देखील महाडिक कुटुंबीयांनी शिवाजी विद्यापीठ येथील कोविड सेंटरला १०० बेड दिले होते. त्याचबरोबर कोल्हापूर शहर तसेच विविध गावात गरजूंना २-३ महिने पुरेल अशा जीवनावश्यक वस्तूंचा देखील पुरवठा करण्यात आला होता.

लोकांची सेवा करणे हाच माझा धर्म

कोल्हापूरने महाडिक कुटुंबीयांना भरभरून दिले आहे, या संकट काळात लोकांची मदत करणे गरजेचे आहे. कोरोनामुळे सामान्य लोक भयभीत झाले असून त्यांना आधार देणे गरजेचे आहे. माझ्या कोल्हापूरचे लोक सुरक्षित असले पाहिजेत, असे धनंजय महाडिक यांनी सांगितले. सर्व रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना घाबरून न जाण्याचे आवाहनही त्यांनी केले.

कुठे आहे हे कोविड सेंटर

कोल्हापूरमध्ये हॉकी स्टेडियम येथील महानगरपालिकेच्या इमारतीमध्ये हे १२५ बेडचे मोफत कोविड सेंटर आहे. या कोविड सेंटरचे वैशिष्ट्य म्हणजे याठिकाणी सर्वच्या सर्व १२५ बेड ऑक्सिजनयुक्त आहेत, तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार करून लहान मुलांसाठी या कोविड सेंटर मध्ये २५ बेड असून पत्रकार बांधवांच्या कुटुंबियांसाठी देखील काही बेड आहेत.

या कोविड सेंटरमध्ये रुग्ण दाखल होण्यापासून ते अगदी तो डिस्चार्ज होईपर्यंत त्याची सर्व देखभाल मोफत करण्यात येणार आहे. रुग्णांसाठी औषधांसोबत पौष्टिक आहार देखील दिला जाणार असून, शरीरातील कोरोना विरोधात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी वेगवेळी फळे दिली जाणार आहेत.  योगा, प्राणायाम सारखे व्यायाम देखील घेतले जाणार आहेत.

जनतेकडून कौतुकाची थाप

महाडिक कुटुंबीय आणि भाजप-ताराराणी आघाडी यांनी उभारलेल्या कोविड सेंटर मुळे हजारो रुग्णांना दिलासा मिळाला आहे. कोल्हापूरमधील इतर कोणत्याही मोठया नेत्याने कोविड सेंटर उभा न केल्यामुळे महाडिक कुटुंबीयांच्या या कामाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. कोल्हापूरमध्ये रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे रुग्णांना देखील या कोविड सेंटरचा मोठा आधार मिळणार आहे.