Mumbai Indians

काय असेल प्ले-ऑफचे समीकरण? मुंबईने पहिल्यांदा फलंदाजी करत २०० धावा केल्या तर काय होईल

दुबई –  आईपीएल २०२१ चा हंगाम अंतिम टप्पात आला असून शुक्रवार रोजी (८ ऑक्टोबर) या हंगामातील साखळी फेरीचे २ अंतिम सामने खेळले जातील. यातील पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात रंगेल.

चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघांनी यापूर्वीच प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. काल झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनेही राजस्थान रॉयल्सला तब्बल ८६ धावांनी पराभूत केल्यामुळे चौथ्या स्थान त्यांनी जवळजवळ पक्के केले आहे. त्यांच्या या मोठ्या विजयामुळे मुंबई इंडियन्सच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या अपेक्षांवर मात्र पाणी फेरले आहे. असे असले तरी, अजूनही मुंबईकडे प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शेवटची संधी आहे. परंतु यासाठीची समीकरणे वाटतात तितकी सोपी नाहीत.

कोलकाता नाईट रायडर्सच्या कालच्या ८६ धावांच्या विजयामुळे त्यांचा नेट रन रेट +०.५८७ इतका झाला असून मुंबईचा मार्ग खडतर बनला आहे. आता त्यांना प्लेऑफमध्ये पात्र ठरणारा चौथा संघ बनण्यासाठी १७० पेक्षा जास्त धावांनी सामना जिंकणे गरजेचे आहे आणि यासाठी त्यांना सामन्यात प्रथम फलंदाजीची संधी मिळणे बंधनकारक आहे.

आज मुंबईचा शेवटचा सामना हैदराबादसोबत होणार आहे. अबु धाबीच्या मैदानावर रंगणाऱ्या या सामन्यात जर मुंबईने पहिल्यांदा फलंदाजी करताना २०० किंवा त्यापेक्षा जास्त केल्या. तर त्यांना हैदराबादवर १७० पेक्षा जास्त धावांनी विजय मिळवणे शक्य होईल. असे झाल्यास कोलकाताच्या बरोबरीने त्यांच्याही खात्यात १४ गुण जमा होतील. याबरोबरच त्यांच्या नेट रन रेटमध्येही वाढ होईल, जो सध्या -०.०४८ आहे. अशाप्रकारे कोलकात्याच्या बरोबरीने समान गुण असूनही नेट रन रेटच्या आधारे मुंबईला प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवता येईल.

परंतु जर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक गमावली आणि हैदराबादचा संघनायक केन विलियम्सनने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. तर तिथेच मुंबईचा आयपीएल २०२१ मधील प्रवास संपुष्ठात येईल. कारण आव्हानाचा पाठलाग करताना विजय मिळवूनही त्यांचा नेट रन रेट कोलकातापेक्षा जास्त होणे जवळपास अशक्य आहे.

ADVERTISEMENT –

Gadre Tea Company
 Gadre Tea Company