Rahul Patil ZP Adhyaksh

कोल्हापूर जिल्हा परिषद अध्‍यक्षपदासाठी राहुल पाटील यांचे नाव निश्‍चित

कोल्‍हापूर- कोल्हापूर जिल्‍हा परिषद अध्‍यक्षपद हे काँग्रेसकडेच राहणार असल्‍याचे जवळपास निश्‍चित आहे. यामुळे कोल्हापूर जिल्‍हा परिषद अध्‍यक्षपदी राहुल पाटील(Rahul Patil) यांची निवड निश्‍चित मानले जात आहे. तर कोल्हापूर जिल्हा परिषदेचे उपाध्‍यक्षपद पुर्वीप्रमाणे राष्‍ट्रवादीकडे राहणार आहे. या पदावर विजय बोरगे यांची वर्णी लागण्‍याची शक्यता आहे.

जिल्‍हा परिषद अध्‍यक्षपदासाठी काँग्रेस व राष्‍ट्रवादी काँग्रेस यांच्‍यात गेल्‍या आठ दिवसांपासून ताणाताणी सुरू होती. पदाधिकार्‍यांचे राजीनामे घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी अध्यक्षपदावर दावा सांगितला. त्यानंतर पालकमंत्री पाटील यांनी तत्काळ सदस्य संख्या पाहता अध्यक्षपदावर काँग्रेसचा हक्क असल्याचे सांगितले.

तत्पूर्वी आमदार पी. एन. पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील यांनी अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये एंट्री केली होती. त्यावेळी पदाधिकार्‍यांनी राजीनामे देखील दिलेले नव्हते.

कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून महाविकास आघाडीमध्ये प्रचंड रस्सीखेच होती. अध्यक्षपद राष्ट्रवादीला मिळावे यासाठी मंत्री मुश्रीफ सुरुवातीपासून ठाम होते. पण आ. पी. एन. पाटील यांनीही चिरंजीव राहुल पाटील यांच्यासाठी आग्रह धरला. शनिवारी सायंकाळी पालकमंत्री पाटील, मंत्री मुश्रीफ व आ. पी. एन. पाटील यांच्यात शासकीय विश्रामधाम येथे अध्यक्षपदाबाबत चर्चा झाली. ही चर्चा सुमारे पाऊण तास झाली होती.