Gokul Election

सत्ताधारी आघाडीच गोकुळमध्ये पुन्हा सत्तेवर येण्याची शक्यता

कोल्हापूर- गोकुळ निवडणूकीचा ज्वर अंतिम टप्प्यात आला असताना एका खासगी संस्थेने केलेल्या सर्वेनुसार गोकुळमध्ये पुन्हा सत्ताधारीच निवडून येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सत्ताधारी आणि विरोधी आघाडी यांच्यात जोरदार संघर्ष या निवडणुकीच्या माध्यमातून कोल्हापूरच्या जनतेला पहायला मिळत आहे.

गोकुळ निवडणुकीच्या सुरवातीच्या टप्प्यात सत्ताधारी आघाडी काहीशी बॅकफूटवर गेलेली पाहायला मिळाली मात्र माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांची झालेली घरवापसी, विरोधी आघाडीत नेत्यांची झालेली भरती, मागच्या वेळच्या निवडणुकीमुळे सावध होऊन यावेळी लावलेली यंत्रणा आणि आपल्या वारसाची राजकीय सोय करण्याचा विरोधी आघाडीच्या नेत्यांचा डाव त्यामुळं गेले काहीवर्ष गोकुळ बचाव मंचच्या माध्यमातून लढणाऱ्या कार्यकर्त्यांची झालेली घोर निराशा सत्ताधारी आघाडीच्या पथ्यावर पडताना दिसत आहे.

मागील निवडणुकीमध्ये गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या आघाडीने सत्ताधारी आघाडीला चांगलाच घाम फोडला होता. काही उमेदवारांना मागील निवडणुकीत निसटता पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे गेली ५ वर्षे गोकुळ बचाव मंचच्या माध्यमातून त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जोरदार संघर्ष केला पण यावेळी होत असलेल्या निवडणुकीत आघाडी भक्कम करण्याच्या उद्देश्याने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, सुजित मिणचेकर यांच्या सहभागाने तिकीट वाटपात गोकुळ बचाव मंचच्या नेत्यांच्या पदरी निराशा पडली. याचा फटका विरोधकांना बसण्याची शक्यता आहे. मागील ५ वर्षात ४०० ठरावधारक वाढले असून याचा फायदा सत्ताधारी राजर्षी शाहू आघाडीला नक्कीच मिळेल.

सत्ताधारी नेत्यांनी गोकुळ चांगलंच चाललंय याचा केलेला जोरदार प्रचार सामान्य दूध उत्पादक आणि ठरावधारकांना भावलेला दिसत आहे. राजू शेट्टी, प्रकाश आवाडे,संग्राम कुपेकर, अशोक चराटी आणि काही छोट्या मोठ्या गटानी अंतिम क्षणी सत्तारूढ गटाला पाठिंबा दिल्याने सत्ताधारी आघाडी सध्याच्या घडीला विरोधी आघाडीवर वरचढ होताना दिसत आहे. विरोधकांनी गोकुळ सोडून फक्त महाडीक नावाचा केलेला जप सुध्दा सामान्य ठरावधारकांच्या पचनी पडलेला दिसत नाही. एकंदरीत सध्यस्थितीत गोकुळची सत्ता पुन्हा सत्ताधारी आघाडीकडेच राहील अशी चिन्हे दिसत आहेत.