Sindhudurga-ZP-BJP-win-nitesh-rane

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीत राणेंचा शिवसेनेला धोबीपछाड

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपनं बाजी मारली आहे. भाजपाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना (Shiv Sena) आणि महाविकास आघाडीला मोठा दणका दिला. भाजपच्या संजना सांवत यांची अध्यक्षपदावर निवड झाली आहे. संजना सावंत यांनी शिवसेनेच्या उमेदवार वर्षा कुडाळकर यांचा 30 विरुद्ध 19 अशा फरकाने पराभव केला आहे. भाजपचा एक सदस्य अनुपस्थित राहिला. भाजपच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. आमदार नितेश राणे यांना उचलून घेत कार्यकर्त्यांनी विजय साजरा केला. यावेळी शिवसेनेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

नारायण राणेंनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची सत्ता भाजपाकडे आली होती. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये भाजपाकडे बहुमत होते. मात्र जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने महाविकास आघाडीच्या मदतीने जोरदार मोर्चेबांधणी केली होती. त्यामुळे तर्कवितर्क लढवले जात होते.

नारायण राणेंचा शिवसेनेवर आरोप

जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जिल्हा बँकेच्या काही अधिकाऱ्यांकडून हस्तक्षेप होत असल्याचा आरोप भाजपचे खासदार नारायण राणे यांनी केलाय. बँकेचं कर्ज घेतलेल्या जिल्हा परिषदेच्या काही सदस्यांना संबंधित अधिकारी संपर्क करुन जप्तीची कारवाई टाळायची असेल तर जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतिश सावंत यांना येऊन भेटा, अशी धमी दिली जात असल्याचा आरोप राणेंनी केला आहे.

इतकच नाही तर तुमच्यावर जप्ती येऊ देणार नाही. तुम्ही आम्हाला येऊन भेटा. तुम्हाला प्रत्येक 25 लाख देतो, असं सतिश सावंत सांगत असल्याचंही राणे म्हणाले होते. त्याचबरोबर जिल्हा बँकेत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी लावून जे दोषी आहेत त्यांना सचिन वाझे याचाबरोबर जेलमध्ये पाठवण्याचा इशाराही राणेंनी दिलाय.

सतिश सावंत यांचा पलटवार

शिवसेनेचे नेते सतिश सावंत यांनी राणेंचा आरोप फेटाळला आहे. राणेंचं राजकीय वजन कमी झाल्यामुळे त्यांनी लोकसभा सोडून जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदारसंघात लक्ष घालावं लागत आहे. आतापर्यंत राणेंच्या एका फॅक्सवर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष ठरत होता. पण आता राणे पिता-पुत्रांना ठाण मांडून बसावं लागत आहे, अशी टीका सावंत यांनी केलीय. तसंच नारायण राणेंपासून आपल्या जिवाला धोका असल्याचंही सावंत म्हणालेत.